शिर्डी (जि. अहमदनगर) : भणंगासारखे आयुष्य जगणाऱ्या कोलकाता येथील एका वयोवृद्ध डॉक्टरला साईनगरीत माणुसकीचे दर्शन घडले. संस्थानच्या रुग्णालयात या डॉक्टरला आपुलकीची सेवा तर मिळालीच. त्याचबरोबर येथील एका व्यावसायिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून नातेवाईक शोधल्यामुळे डॉ. टी़ के.मुखर्जी यांना पुन्हा त्यांचे कुटुंबीय मिळाले.येथील हॉटेल व्यावसायिक यज्ञेश रावळ यांना २२ फेब्रुवारीला साई उद्यानजवळ एक व्यक्ती अत्यवस्थ अवस्थेत आढळली. त्यांनी त्यास काही खाण्यासाठी व ब्लँकेट दिले़ दुसऱ्या दिवशी त्या भटक्या माणसाची स्थिती अधिक बिघडल्याचे त्यांच्या लक्षात आले. रावळ यांनी उपनगराध्यक्ष निलेश कोते यांना त्याची माहिती देऊन मुखर्जी यांना साईबाबा रुग्णालयात अपघात विभागात दाखल केले़ वैद्यकीय संचालक डॉ़ विजय पाटील यांच्या सूचनेनुसार डॉक्टरांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले. तीन दिवसानंतर मुखर्जी काहीसे सावरल्यानंतर त्यांनी स्वत:चे व त्यांच्या नातेवाईकांचे नाव सांगितले. त्यावरुन रावळ यांनी फेसबुकच्या माध्यमातून नातेवाईकांचा अहोरात्र शोध सुरू केला़ तीन दिवसांपूर्वी त्यात त्यांना यश मिळाले. सोमवारी जमशेदपूर येथून मुखर्जी यांचे जावई व मुलगी त्यांना घेण्यासाठी रुग्णालयात आले. २१ दिवस वैद्यकीय अधीक्षक डॉ़ पाटील, प्रशासकीय अधिकारी डॉ़ मैथिली पितांबरे, मेट्रन मंदा थोरात यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवले. रावळ पती-पत्नी जवळच्या नातेवाईकाप्रमाणे सकाळ -सायंकाळ जेवण, नाश्ता घेऊन येत होते. (प्रतिनिधी)- मुखर्जी यांना दोन मुली असून ते जमशेदपूर येथील मुलीकडून कोलकात्याला जाताना शिर्डीत आले. येथे त्यांच्या मोबाईलसह सर्व सामानाची चोरी झाली, त्या धक्क्याने ते आजारी पडले होते व भिक्षेकऱ्याचे जीवन त्यांच्या नशिबी आले होते. २१ दिवस वैद्यकीय अधीक्षक डॉ़ पाटील, प्रशासकीय अधिकारी डॉ़ मैथिली पितांबरे, मेट्रन मंदा थोरात यांनी त्यांची काळजी घेतली.
सोशल मीडियामुळे सापडले कुटुंबीय
By admin | Published: March 15, 2016 1:48 AM