राज्यातील दुष्काळग्रस्त वाशीम जिल्ह्यातील एका कुटुंबानं संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. गावची पाण्याची समस्य दूर व्हावी यासाठी लॉकडाऊन काळात राहत्या घरातच कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून अवघ्या २२ दिवसांत २० फूट खोल विहीर खणली आहे. इतकंच नव्हे, तर आणखी पाणी मिळावं आणि गावाची तहान भागावी यासाठी आणखी खोल खोदकाम करण्याचा कुटुंबाचा मानस आहे.
वाशीमच्या जामखेड गावातील रामदास पोफळे यांनी लॉकडाऊनमध्ये घराच्या बाहेर जाणं टाळायचं होतं यासाठी कुटुंबीयांना सोबत घेऊन घरातच विहीर खणण्याचं ठरवलं. त्यानुसार रामदास पोफळे स्वत:, त्यांची पत्नी आणि १२ वर्षीय मुलाला सोबत घेऊन त्यांनी काम सुरू केलं. २२ दिवसांत तिघांनी मिळून २० फूट खोल विहीर खणली.
"गावात पाण्याची खूप मारामार आहे. लॉकडाऊनमध्ये तसंही हाताशी काही काम नव्हतं. त्यामुळे घरातच विहीर खणण्याचा मानस मी कुटुंबीयांसमोर व्यक्त केला. त्याला त्यांनीही होकार दिला. २२ दिवस आमचं विहीर खणण्याचं काम सुरू होतं. २० फूट खोल खणल्यानंतर आम्हाला पाणी लागलं. पण इतक्या पाण्यात केवळ माझ्या कुटुंबाचीच पाण्याची गरज पूर्ण होईल. त्यामुळे आणखी ५ ते १० फूट खोल खणण्याचा विचार आम्ही केला आहे की जेणेकरुन परिसरातील इतरांनाही पाणी मिळेल", असं रामदास पोफळे यांनी सांगितलं.