ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - कुटुंबियांचा विरोध पत्करुन, धमक्या सहन करुन तिने प्रेमविवाह केला. पण अवघ्या चार वर्षातच नियतीने सुखी संसार तिच्याकडून हिरावून घेतला. ऐन तारुण्यात इतका मोठा आघात झाल्यानंतरही सोनिया साटमने दुस-यांच्या आयुष्याचा विचार केला आणि मृत नव-याचे अवयवदानाचा निर्णय घेतला. ज्यामुळे काही जणांना नवे आयुष्य मिळणार आहे.
सोनियाचे २०१२ मध्ये शेखर साटमबरोबर लग्न झाले. कुटुंबियांच्या विरोधात जाऊन तिने शेखर बरोबर लग्न केले. सोनियाला तिच्या कुटुंबियांनी धमक्याही दिल्या. मात्र प्रेमाखातर तिने हे सर्व सहन करत शेखरबरोबर संसार थाटला. ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करणारा शेखर रविवारी कामानिमित्त बोरीवलीला जात असताना त्याच्या बाईकला अपघातात झाला.
अपघाताच्यावेळी शेखरने हेल्मेट घातले नव्हते त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. रस्त्यावरुन जाणा-या वाटसरुंनी शेखरला बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी साटम कुटुंबाला अपघाताची माहिती कळवल्यानंतर कुटुंबियांनी अंधेरीच्या अंबानी रुग्णालयात त्याला हलवले.
डॉक्टरांनी शेखरला ब्रेनडेड घोषित केले. सोनियाला काहीतरी चमत्कार घडेल आणि शेखर शुद्धीवर येईल अशी आशा होती. पण अखेर तिने स्वत:ची समजूत घातली आणि शेखरचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे इतरांना नवीन आयुष्य मिळेल. शेखरच्या यकृतामुळे दोन रुग्णांना जीवदान मिळणार असून नेत्रदानामुळे एकाला नवी दृष्टी मिळणार आहे.
सोनिया दिल्लामध्ये एमबीए करत असताना तिची आणि शेखरची ओळख झाली. त्यांच्या लग्नाला सोनियाच्या कुटुंबियांचा विरोध होता. त्यांनी शेखरपासून दूर करण्यासाठी सोनियाला हरयाणाला पाठवून दिले होते. तिला नऊ महिने फोनपासून त्यांनी दूर ठेवले. अखेर संधी मिळाल्यानंतर तिने शेखरला पहिला फोन केला. शेखर मला मुंबईत घेऊन आला. माझ्या कुटुंबियांनी वाकोला पोलिस ठाणे गाठले. त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. पण मी शेखर बरोबर रहाण्याचा निर्णय घेतला.