तीन महिण्यांत केवळ १३० शस्त्रक्रिया : कुटूंब नियोजन विमा योजनेपासून ग्रामीण लाभार्थी अनभिज्ञवाशिम : कुटूंब कल्याण शस्त्रक्रियांसंबधी शासनस्तरावरून विविध प्रकारच्या महत्वाकांक्षी योजना राबविल्या जातात. मात्र, जिल्हास्तरावर या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने शासकीय रुग्णालयांमधील शस्त्रक्रियांचे प्रमाण झपाट्याने घटण्यासोबतच कुटूंब नियोजन विमा योजनेपासूनचही ग्रामीण भागातील लाभार्थी अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट होत आहे. वाशिम जिल्ह्यात वाशिममध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय कार्यान्वित असून कारंजा लाड, मंगरूळपीर, रिसोड, कामरगांव, मालेगावं, मानोरा आणि अनसिंग अशा ७ ठिकाणी ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित आहे. त्यापैकी कारंजा, मंगरूळपीर, रिसोडच्या ग्रामीण रुग्णालयासह जिल्हा सामान्य रुग्णालयात कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या जातात. एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत जिल्ह्याला ११८२ कुटूंब नियोजन शस्त्रक्रियांचे उद्दीष्ट मिळाले होते. प्रत्यक्षात मात्र १००८ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. विशेष गंभीर बाब म्हणजे रिसोडच्या ग्रामीण रुग्णालयात गतवर्षी १९३ शस्त्रक्रियांचे उद्दीष्ट असताना केवळ २१ शस्त्रक्रिया उरकण्यात आल्या. चालूवर्षी एप्रिल ते जून या तीन महिण्याच्या कालावधीत ११८२ पैकी केवळ १३० शस्त्रक्रिया झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. यात कारंजा आणि रिसोड शून्यावर असून मंगरूळपीरच्या ग्रामीण रुग्णालयात केवळ १ शस्त्रक्रिया झालेली आहे. तथापि, शासकीय रुग्णालयात कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया केल्यास मिळणाऱ्या फायद्यांविषयी लाभार्थी अनभिज्ञ असल्यामुळेच ही बिकट अवस्था उद्भवल्याचे पाहावयास मिळत आहे.
'कुटूंब कल्याण' शस्त्रक्रियांचे प्रमाण नगण्य !
By admin | Published: July 20, 2016 7:39 PM