पुणे : राज्यात तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील मे महिन्यात होणाऱ्या निवडणुकीच्या मतदानावेळी लग्न मुहूर्तांचा दुष्काळ असणार आहे. यात २ मे ते १२ जूनपर्यंत लग्नाचे कोणतेच मुहूर्त नाहीत. मात्र, मुलांच्या शाळांना लागलेल्या सुट्ट्यांचा सुकाळ आहे. त्यामुळे मतदारराजा घरात सापडेल का, हा खरा प्रश्न आहे. मे महिन्यात मतदारांना मतदानाला येण्यास प्रोत्साहित करणे हे उमेदवारांसमोरील मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तिसऱ्या टप्प्यात ७ मे, चौथ्या टप्प्यात १३ मे आणि पाचव्या टप्प्यासाठी २० मे अशा तीन टप्प्यांत ३५ लोकसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे. साधारणत: दरवर्षी मे महिन्यात लग्नाचे मुहूर्त असतात, यंदा मात्र मे ते जून दरम्यान जवळपास सव्वा महिना लग्नाचे मुहूर्त नाहीत.
उमेदवारांसाठी ही आनंदाची गोष्ट असली तरी शाळांना लागलेल्या सुट्ट्या आणि कुटुंबीयांनी केलेले ट्रिपचे नियोजन ही उमेदवारांकरिता काहीशी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर कुटुंबांकडून ट्रिपचे नियोजन केले जाते. यंदाही कुटुंबांमध्ये सुट्टीसाठी बाहेरगावी जाण्याचे नियोजन सुरू झाले आहे. अगदी फॉरेन टूरची आखणी केली जात आहे. याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो.
यंदा निवडणुका आणि लग्न तारखा एकत्र आलेल्या नाहीत. एप्रिलनंतर थेट जूनमध्येच मुहूर्त आहेत. त्यामुळे निवडणुकांवर कोणताच फरक पडणार नाही.- मोहन दाते, पंचांगकर्ते