ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २२ - आपल्या सुरेल गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे प्रख्यात शास्त्रीय गायक व कुमार गंधर्व यांचे पुत्र मुकुल शिवपुत्र यांना चोरट्यांनी जीवे मारण्याची धमकी देऊन भर दिवसा लुटून ७५ हजार रूपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. वारजे येथील एनडीए रस्त्यावरील भाजी मंडई येथे ही दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रिया अनंत आचार्य (वय ३२, रा. अतुलनगर, वारजे) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांपासून मुकुल शिवपूत्र हे आचार्य यांच्या घरी रहायला आहेत. विविध ठिकाणी होणारे शास्त्रीय गाण्यांचे कार्यक्रमातून त्यांना उत्पन्न मिळते. मंगळवारी दुपारी ते सारसबागेज जाऊन येतो असे त्यांनी प्रिया यांना सांगितले. त्यास त्यांनी नकार दिल्यानंतरही ते गेले. दुपारी तीनच्या सुमारास ते घरी परतत असताना वारजे येथील भाजी मंडई येथून त्यांनी प्रिया यांना फोन केला. मी घरी येत आहे, भाजी आणायची आहे का? याची चौकशी केली. त्यावर प्रिया यांनी त्यांना त्वरीत घरी येण्यास सांगितले.
भाजी घेत असताना शिवपूत्र यांचे भाजीवाल्यासोबत भांडणे झाली. तेथून ते घरी निघालेले असताना चार जणांनी त्यांना घेरले. त्यांच्याशी झटापट करून त्यांच्या हातातील काळ्या रंगाची बॅग हिसकाऊन घेऊन तेथून पळ काढला. ही घटना घडल्यानंतर शिवपूत्र घरी आले. त्यांनी प्रिया यांना घडलेला प्रकार कानावर घातला. परंतू, प्रकृती बिघडल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्यास नकार दिला. त्यामुळे प्रिया यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
त्यामध्ये १५०० रूपयांची बॅग, ७५ हजार रुपए रोख असा एकुण ७६ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरला गेल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. ए. पांडुळे करत आहेत.