किवळे : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची सन २०१६ची प्रारूप मतदार यादी उपाध्यक्षा अॅड. अरुणा पिंजण यांच्या स्वाक्षरीने शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली. बोर्डाच्या सात प्रभागांत एकूण ३४ हजार ५३३ मतदार आहेत. त्यात १७ हजार ३६४ पुरुष मतदार असून, १७ हजार १६९ महिला मतदार आहेत. सर्व नागरिकांना ही मतदार यादी पाहण्यासाठी बोर्डाच्या कार्यालयात कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान उपलब्ध राहणार आहे. २० जुलैपर्यंत नाव व पत्त्यात दुरुस्ती, नवीन नावे समाविष्ट करणे, यादीतील नावांबद्दल हरकती व दावे विहित नमुन्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दाखल करता येणार आहे. त्यावरील सुनावणी येत्या १८ आॅगस्टपासून होणार आहे. कॅन्टोन्मेंट कायद्यानुसार अंतिम मतदार यादी येत्या १५ सप्टेंबरला प्रसिद्ध होणार आहे. कॅन्टोन्मेंट निवडणूक कायदा २००७च्या कलम दहा अन्वये देशातील सर्व ६२ कॅन्टोन्मेंट बोर्डात दर वर्षी मतदार यादी तयार करण्यात येते. त्यानुसार देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या वतीने १५ एप्रिल २०१५ पासून हद्दीतील सात प्रभागांतील मतदार यादी तयार करण्यासाठी ७१ शिक्षक प्रगणकांची नेमणूक केली होती. त्यांनी घरोघरी प्रत्यक्ष जाऊन विहित नमुन्यातील अर्ज प्रत्येक कुटुंबप्रमुखाकडून सहीनिशी भरून घेतला आहे. १ मार्च २०१६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण असणाऱ्या व बोर्डाच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांची नावे मतदार यादीत समविष्ट करण्यात आली आहेत. मतदार यादी बनविताना व्यक्तीचे नाव, १ मार्च २०१६ रोजीचे वय, पूर्ण पत्ता, ( घर क्रमांकासह ) , अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती याबाबत माहिती घेण्यात आली.शुक्रवारी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. यादी मराठी व इंग्रजी भाषेत असून, पाहण्यासाठी बोर्ड कार्यालयात २० जुलैपर्यंत उपलब्ध आहे. (वार्ताहर) प्रभागनिहाय मतदार - प्रभाग एक : ४१५० प्रभाग दोन : ५१९२ प्रभाग तीन : ५१९०प्रभाग चार : ७१५२ प्रभाग पाच : ४७६९ प्रभाग सहा : ४६३७ प्रभाग सात : ३४४३ एकूण मतदारसंख्या : ३४,५३३ मतदार यादीतील नाव, पत्ता व वयात दुरुस्ती करणे , नवीन नावे समाविष्ट करणे, नावांवर हरकती घेणे, दावे विहित नमुन्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दाखल करण्यासाठी २० जुलै-पर्यंत मुदत आहे. मुदतीनंतरच्या आलेले दावे, हरकती व नवीन नावांचा अंतिम मतदार यादीसाठी विचार होणार नाही.
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
By admin | Published: July 02, 2016 2:09 AM