पुणे : ब्र, भिन्न आणि कुहू या गाजलेल्या कादंबरींच्या लेखिका आणि कवियत्री कविता महाजन यांचे आज सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. कविता महाजन या काही दिवसांपासून न्यूमोनियाने आजारी होत्या. बाणेर येथील चेलाराम हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांना गेल्या महिन्याभरापासून फुफ्फुसाचा त्रास जाणवत होता.
कविता महाजन या महिनाभरापूर्वीच पुण्याला मुलीकडे गेल्या होत्या. मुलीला ताप येत असल्याने त्यांनी तिला चेलाराम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र, त्यांनाही ताप आणि फुफ्फुसाचा त्रास जाणवू लागल्याने बाणेर येथील चेलाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कविता महाजन यांचा जन्म नांदेडमध्ये झाला होता. मराठी विश्वकोषाचे माजी सचिव एस. डी. महाजन यांच्या त्या मुली होत. कविता महाजनांचे शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयामध्ये झाले. त्यानंतर नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्यांनी मराठी साहित्य या विषयामध्ये एम.ए. ही पदवी मिळविली होती.