मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना तृतीय स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यासाठी मंगळवारी शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर बाळासाहेबांच्या चाहत्यांनी आणि शिवसैनिकांनी गर्दी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी साडेअकराच्या सुमारास स्मृतिस्थळी भेट देत बाळासाहेबांना सहकुटुंब आदरांजली अर्पण केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली. त्यांच्यासमवेत गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आदी मंत्री उपस्थित होते. रिपाइं अध्यक्ष खा. रामदास आठवले, खा. पूनम महाजन, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, भावना गवळी यांनीही बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्कवर मोठ्या प्रमाणावर सजावट करण्यात आली होती. बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे स्मृतिस्थळाच्या सजावटीसाठी बाळासाहेबांच्या आवडत्या फुलांचा आणि रोपट्यांचा वापर करण्यात आला होता. स्मृतिस्थळावरील सोनचाफ्याची रोपटी, रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. स्थानिक शिवसेना आमदार, विभागप्रमुखांनी अभ्यागतांसाठी अल्पोपाहाराची व्यवस्था केली होती.ट्विटरवरून श्रद्धांजलीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच जनतेच्या भल्यासाठी झटणारे नेते होते. त्यामुळेच बाळासाहेबांना कार्यकर्त्यांमध्ये कायमच आदराचे स्थान होते, अशा शब्दांत मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शिवाजी पार्क, दादर, प्रभादेवी, माहीम, हिंदमाता परिसरात बाळासाहेबांच्या अभिवादनाचे फलक मोठ्या प्रमाणावर लावण्यात आले होते; तसेच ठिकठिकाणी भगवे झेंडे, कमानी उभारण्यात आल्या होत्या. अमोघ वक्तृत्वाचे धनी, परखड लेखक, महान व्यंगचित्रकार, शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी शत शत नमन!, असे ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बाळासाहेबांना तृतीय पुण्यतिथीनिमित्त ‘मानाचा मुजरा’.. शेवटपर्यंत अविस्मरणीय.. अशा शब्दांत मंत्री पंकजा मुंडेंनी बाळासाहेबांबद्दल आदर व्यक्त केला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही ट्विटरमार्फत बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे.
चाहत्यांनी वाहिली बाळासाहेबांना श्रद्धांजली
By admin | Published: November 18, 2015 3:15 AM