मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधकांनी विधिमंडळाच्या कामकाजावर बहिष्कार टाकलेला असतानाच आज मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यास पोलिसांकडून मारहाण झाल्याची घटना मंत्रालयात घडली. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी याचा इन्कार केला असून उलट शेतकऱ्यानेच पोलिसाला चावा घेतल्याचे म्हटले आहे. रामेश्वर भुसारी असे शेतकऱ्याचे नाव असून ते मूळचे औरंगाबाद येथील रहिवासी आहेत. गारपिटीमुळे त्यांच्या पॉलीहाउसचे नुकसान झाले होते. त्याच्या नुकसानभरपाईच्या मागणीसाठी त्यांनी गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मंत्रालय गाठले. मंत्रालय बंद होण्याच्या वेळेत भुसारी तेथे आल्याने तेथील सुरक्षारक्षकाने त्यांना अटकाव केला. मात्र तरीही त्यांनी आतमध्ये प्रवेश केला. तेथील पोलीस जबरदस्तीने त्याला बाहेर काढत असताना त्याने पोलिसाच्या हातावर चावा घेतला. यामध्ये मंत्रालय सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस शिपाई पाटणकर हे जखमी झाले. यावेळी झालेल्या झटापटीत भुसारी यांच्या चेहऱ्याला मार बसला. पोलिसांनी तत्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तर जखमी पोलिसावरही उपचार सुरु आहेत. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त मनोज शर्मा यांनी दिली. तर दुसरीकडे भुसारी यांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्र्यांना पत्र देउन बाहेर निघणार होतो. (प्रतिनिधी)
मंत्रालयात शेतकऱ्याला मारहाण
By admin | Published: March 24, 2017 2:32 AM