आटपाडी : परदेशात जाणाऱ्या साखरेचे अनुदान केंद्र सरकारने बंद केले आहे. कांदा, डाळिंबाची निर्यात थांबवली आहे. दुधाची पावडरही निर्यात होऊ न देण्याची भाजपची नीती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त केले, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.विटा येथे आज (रविवारी) राष्ट्रवादीचे खानापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अमरसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, अशोकराव गायकवाड, बाबासाहेब मुळीक उपस्थित होते. पवार म्हणाले की, अवघ्या तीन महिन्यात मोदींना लोकसभेसाठी साथ दिल्याची चूक लोकांच्या आता लक्षात आली आहे. उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अवघ्या दोन जागा निवडून आल्या, मात्र पोटनिवडणुकीत भाजपचा ९ पैकी ८ जागांवर पराभव झाला. मोदी पंतप्रधान झाले तरी गुजरातमधून अजून बाहेर पडायला तयार नाहीत. जो माणूस देशाचे नेतृत्व करतो, पण आपल्याला मानत नाही, त्याच्या हाती सत्ता सोपविण्याची चूक येथील जनता कदापि करणार नाही. महाराष्ट्र हे गुंडांचे, दरोडेखोरांचे राज्य आहे, अशी जाहिरात भाजप करत आहे. महाराष्ट्राची बेईज्जत भाजपएवढी कुणी केली नाही. या भागातील टेंभू योजनेसह दुष्काळासारख्या प्रत्येक संकटात आम्ही साथ दिली. नव्या पिढीतील अमरसिंह देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. आर. आर. पाटील म्हणाले की, मोदी प्रचारासाठी आज तासगावला आले, नगरपालिका निवडणुकीतसुद्धा ते येतील. शेतकऱ्यांच्या मालाचे दर वाढू नयेत यासाठी उद्योगपतींच्या वस्तूंचे दर वाढवत आहेत. जयंत पाटील म्हणाले की, स्वत:च्या ताकदीवर निवडून येत नाही म्हटल्यावर बाबर पक्ष सोडून गेले. अमरसिंह देशमुख म्हणाले की, उंबरगाव ते बोरगावपर्यंतचे सगळे प्रश्न समजून घेऊन सोडविण्याचे आदेश पक्षनेतृत्वाने दिले आहेत. यावेळी किरण माने, विलासराव शिंदे, अरुण लाड, हणमंतराव देशमुख, सभापती अलका भोसले आदी उपस्थित होते. (वार्ताहर)भाजपचा राज्याचे तुकडे करण्याचा डाव मतांच्या जोगव्यासाठी केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा प्रयत्न करीत आहे. जनता ते कदापी सहन करणार नाही, असा इशारा शरद पवार यांनी जत येथील सभेत दिला. ते म्हणाले की, देशात सर्वाधिक जादा आत्महत्या महाराष्ट्रात नव्हे, तर गुजरातमध्ये झाल्या आहेत. त्यावेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. आज त्यांनी जाणूनबुजून तासगावात सभा घेतली आहे. परंतु आर. आर. यांचे कर्तृत्व उत्तुंग असल्याने तेच विजयी होतील.
मोदी सरकारमुळे शेतकरी उद्ध्वस्त
By admin | Published: October 05, 2014 10:15 PM