सासवड : भाकरीसाठी मरणारा महाराष्ट्र, दीन-दलितांच्या खोपट्यांतून अन्यायाच्या किंकाळ्या फोडणारा आजचा महाराष्ट्र, बलात्कार आणि दलितांच्या अत्याचाराचा आजचा महाराष्ट्र. शेतकरी आज मरतोय, कालही मरत होता अशी आजची स्थिती आणि राजकारणी सिंहासने उबवतायेत. डॉक्टर पाच पाच खून करतोय आणि पोलीसही तक्रारदार महिलेवर अत्याचार करतोय असा आजचा महाराष्ट्र. या स्थितीत युवकांनी पुढे येऊन विवेकाने काहीतरी केले पाहिजे, अशी अपेक्षा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी येथे व्यक्त केली.सावली फाउंडेशनच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सत्रातील पुष्प गुंफताना ‘शिवराय आणि आजचा महाराष्ट्र’ या विषयी बोलताना सबनीस बोलत होते.राजा शिवराय यांच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकत त्यांची राजनीती, सर्व जातिधर्मांच्या लोकांचा सहभाग आणि शेतकऱ्यांविषयीची भावना, कडक शिस्त अशा अनेक गोष्टींचा परामर्श घेत लोककल्याणाची ग्वाही देणारा राजा, असे वर्णन सबनीस यांनी केले. आणि आजच्या महाराष्ट्राच्या एकूण स्थितीची तुलना केली कार्यक्रमाच्या सुरुवातीला संगीतरत्न प्रवीण गायकवाड यांच्या अभंगवाणीचा सुंदर कार्यक्रम झाला. गायकवाड यांना रवींद्र जाधव, प्रमोद खेनट, श्रीकांत जाधव, काटे गुरुजी. ऐश्वर्या कामथे यांनी सुरेख साथसंगत केली. प्रमुख पाहुणे सबनीस यांचा परिचय गणेश बागडे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रमोद कारकर व दीपक म्हस्के यांनी केले. सायली धनाबाई हिने आभार व्यक्त केले .या व्याख्यानमालेचे अत्यंत देखणे आणि नेटके संयोजन सावली परिवाराच्या उमेश कुदळे, गणेश बागडे, सागर भगत, गणेश झेंडे, दिनेश राऊत, प्रदीप सूर्यवंशी, विशाल कुदळे, श्रीकृष्ण ढोले, नितेश चव्हाण या टीमने उत्तमपणे केले. साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. >पुरस्कारार्थींचा गौरवआचार्य अत्रे सभागृहात रंगलेल्या या व्याख्यान कार्यक्रमाच्या प्रारंभी संगीत अलंकार प्रवीण गायकवाड, इतिहासलेखक शिवाजीराव एक्के आणि प्रदीप सूर्यवंशी यांचा त्यांच्या योगदानाबद्दल सबनीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सबनीस यांनी मनोगतात सर्वप्रथम सावली फाउंडेशनच्या कामाबद्दल गौरवपूर्ण कौतुक केले.
शेतकरी आज मरतो आहे, कालही : सबनीस
By admin | Published: August 24, 2016 1:28 AM