- राजेंद्र मांजरे- खेड (दावडी) : फ्लॉवर या पिकाने चांगलाच बाजारभाव खाल्ला असून, निमगाव व दावडी (ता. खेड) या परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फ्लॉवरचे पीक आहे. सध्या पंधरा रुपये प्रति किलो फ्लॉवर या पिकाला बाजारभाव मिळत असून, सुमारे आठ ते नऊ कोटी रुपयांची उलाढाल या परिसरात झाली असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे फ्लॉवर उत्पादक शेतकरी मालामाल झाला आहे. दावडी निमगाव या परिसरात उन्हाळी हंगामात गेल्या काही वर्षांपासून फ्लॉवर या पिकाचे उत्पादन घेत आहेत. यंदा चांगला दर पिकाला मिळत आहे. दावडी व निमगाव या परिसरातून एका बाजूने चासकमान धरणाचा डावा कालवा दुसºया बाजूने भीमा नदी असल्यामुळे येथे बाराही महिने पाण्याची उपलब्धता होते. निमगाव परिसरात सुमारे ५०० एकर, तसेच दावडीमध्ये ३०० एकरांवर शेतकऱ्यांनी फ्लॉवर पिकाचे उत्पादन घेतले आहे. या गावात उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असलेला शेती हा परंपरागत व्यवसाय. तो जोपासण्यासाठी हा शेतकरी जिवाचे रान करतो. या व्यवसायातून आपल्या किमान गरजा पूर्ण होतील, या अपेक्षेने तो शेतात सतत घाम गाळत असतो. या घामाचा योग्य मोबदला मिळावा हा त्याचा प्रामाणिक हेतू असतो.वास्तविक फ्लॉवर हे पीक तिन्हीही हंगामात घेता येते. याच्या उत्पादनासाठी जमीन चांगल्या प्रतीचे लागते. उन्हाळी हंगामात ६०ते ६५ दिवसांत हे पीक काढणीस येते. उन्हाळा असल्याने जमिनीतील उष्णतेमुळे आतील किटाणू मरतात. त्यामुळे शक्यतो या पिकांवर रोगराई पडत नाही.काही पिकांचे वाण लवकर, तर काही वाण उशिरा येतात. एक एकर क्षेत्राला सुमारे ५० हजार रुपये खर्च येतो. फ्लॉवर रोपे लागवड खुरपणी औषधफवारणी त्याची देखभाल याकडे शेतकºयांचे लक्ष असते. तसेच लग्नसीझन असला, तरी गावातील कोणाचे लग्न असले तरी शेतकरी लग्नाला जात नाही. मात्र, सर्व कुटुंबीय दररोज शेतात दिवसभर शेतात काम करत असल्याचे चित्र दिसत आहे. दिवसा गावात जर एक चक्कर मारली तर एकही माणूस गावात शोधून सापडणार नाही असे चित्र सध्या तरी दिसत आहे. दावडी (ता. खेड) येथील शेतकरी आत्माराम डुंबरे यांनी सांगितले, दोन एकर क्षेत्रात फ्लॉवर पीक घेतले होते. लागवडीपासून पीक काढणीपर्यंत सुमारे ६० हजार रुपये खर्च झाला.५ लाख रुपये त्याला निव्वळ नफा राहिला.बाजारपेठेचा अभ्यास करून भाजीपाल्याची शेती केली पाहिजे.बाजारपेठेच्यामागणी वेगळी, अन् आपले उत्पादन वेगळे असेल तर शेती परवडत नाही. सर्वच ठिकाणी फ्लॉवर या पिकाला चांगला भाव मिळतो. हा भाव वर्षभर उत्पादकाला परवडेल, असा असल्यामुळे ही शेती लाभदायक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
.........................
शेतकऱ्यांच्या आयुष्यात या पिकाने आत्मविश्वास निर्माण केला असून, दर वर्षी आणखीन काही एकर क्षेत्रात पीक घेण्याची तयारी करीत आहे. उन्हाळ्यात पाण्याचा अंदाज घेऊन शेती करत असल्यामुळे ती आपल्याला फायदेशीर ठरत आहे. उन्हाळी हंगामात फ्लॉवर पीक घेतले जाते. दोन ते अडीच महिन्यांत हे पीक निघते. अळी व बुरशीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे जागरूकतेने फवारण्या कराव्या लागतात. फ्लॉवर पीक काढणीला आल्यानंतर, एका गड्डीला किमान ३ किलो पाला निघतो. हा पाला शेतातच कुजवला तर तो खत म्हणून अतिशय उपयोगी ठरतो..या परिसरातील शेतकऱ्यांनी प्रत्येकी दोन ते तीन एकर क्षेत्रात फ्लॉवर हे पीक घेतले आहे. सध्या प्रति किलोला १५ रुपये बाजार भाव मिळत आहे. येथील शेतकऱ्यांच्या बांधावर थेट व्यापारी येत असून सौदा करीत आहे. काही शेतकरी पुणे-मुंबई येथे पीक विक्रीसाठी पाठवत आहे. दावडी, निमगाव या परिसरात उन्हाळी हंगामात ८ ते ९ कोटी रुपायांची उलाढाल या पिकांची झाली आहे. एका शेतकऱ्यांने ५० लाखांचे उत्पादन घेतले आहे. - बाळासाहेब शिंदे पाटील, शेतकरी निमगाव ता. खेड