यवतमाळ: नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून यवतमाळमधील शेतकऱ्यानं आत्महत्या केली. शेतकऱ्यानं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत भाजपा-शिवसेना सरकारचा उल्लेख आहे. शेतकऱ्यानं त्याच्या आत्महत्येसाठी राज्य सरकारला जबाबदार धरलं आहे. शेतकऱ्यानं लिहिलेली चिठ्ठी मृतदेहाशेजारी आढळून आली.यवतमाळच्या पांढरकवडामधील पहापळचे रहिवासी असलेल्या 52 वर्षीय धनराज बळीराम नव्हाते यांनी काल आत्महत्या केली. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मृतदेहाजवळ सापडली. यामध्ये त्यांनी त्यांच्या अवस्थेसाठी राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारला जबाबदार धरलं आहे. नव्हाते यांची 4 एकर शेती असून त्यांच्यावर सावकाराचं 2 लाखांचं कर्ज होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली. गेल्या काही वर्षांमध्ये नापिकीमुळे धनराज यांचं शेतीत मोठं नुकसान झालं, अशी माहिती त्यांच्या कुटुंबानं दिली. नव्हाते बुधवारी सकाळी त्यांच्या विवाहित मुलीला भेटण्यासाठी घराबाहेर पडले. त्यांची मुलगी वणीला वास्तव्यास आहे. मात्र ते दुसऱ्या दिवशी घरी परतले नाहीत. यानंतर कुटुंबानं त्यांचा शोध सुरू केला. त्यावेळी त्यांचा मृतदेह त्यांच्याच शेतातील खड्ड्यात सापडला. त्यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे.
माझ्या आत्महत्येला भाजपा-शिवसेना सरकार जबाबदार; चिठ्ठी लिहून शेतकऱ्यानं संपवली जीवनयात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 10:32 AM