कर्जमुक्ती हवेत, सिंचन कर गाळात; अर्थसंकल्पावर शेतकरी नेते राजू शेट्टी यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 13:41 IST2025-03-11T13:37:35+5:302025-03-11T13:41:28+5:30
कोल्हापूर : राज्य सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे कर्जमुक्ती हवेत, सिंचन कर गाळात, कृषी प्रक्रिया उद्योग रसातळात, खताच्या किमती आभाळात, शेतकरी ...

कर्जमुक्ती हवेत, सिंचन कर गाळात; अर्थसंकल्पावर शेतकरी नेते राजू शेट्टी यांची टीका
कोल्हापूर : राज्य सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे कर्जमुक्ती हवेत, सिंचन कर गाळात, कृषी प्रक्रिया उद्योग रसातळात, खताच्या किमती आभाळात, शेतकरी फक्त शक्तिपीठच्या भूसंपादनात, सोयाबीन-तूर-कांदा-कापूस सडतोय शिवारात, राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी मात्र शिवारातील तणकाटात तर राज्यकर्ते, अधिकारी, दलाल मात्र राजमहालात असे वर्णन करावे लागेल, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितले.
अर्थसंकल्पात औद्योगिक धोरणामध्ये कृषी औद्योगिक धोरणाला महत्त्व देणे गरजेचे होते. महायुतीने विधानसभा निवडणुकीत जाहीर केलेले जाहीरनाम्यातील किमान हमीभावावर २० टक्के अनुदान , शेतकरी कर्जमाफी, खतांवरील राज्य सरकारचा जीएसटी कमी करणे, सोयाबीनला ६ हजार हमीभाव देणे, कृषी प्रक्रिया केंद्र उभारणी, पायाभूत सोयी सुविधा, पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाकरिता अधुनिक तंत्रज्ञान व सोयी सुविधा, यासारख्या कोणत्याच गोष्टींचा यामध्ये उल्लेख नाही.
शेती व्यवसायाला बगल दिल्याने याचे दुरगामी परिणाम शेतकरी व शेतमजुरांना भोगावे लागणार आहे. सिंचन कर आकारणी स्थगिती दिले असल्याचे जलसंपदामंत्री सांगत होते, मात्र त्याबाबत कोणतेच वक्तव्य वित्तमंत्री यांच्याकडून करण्यात आलेले नाही. एकीकडे बड्या उद्योगपतींच्या अनेक मोठमोठ्या प्रकल्पाकरिता करामध्ये सवलती देण्यात आल्या आहेत व शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडण्यात असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.