उस्मानाबाद : मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कर्जमाफी ही फसवी असून, शेतकऱ्यांची भावनेशी का खेळता, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजु शेट्टी यांनी तुळजापुरात केला. तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत, त्यावर सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या आंदोलनाच्या वणव्याला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
पुढे बोलताना शेट्टी म्हणाले की, विधानसभा निवडणूक प्रचार काळामध्ये सत्तेमध्ये असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वारेमाप घोषणा केल्या. शेतकऱ्यांना चिंता मुक्त करणार असे म्हटले. शरद पवारांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार, काँग्रेसच्या नेत्यांनीही अशीच घोषणा केली. भाजपा सारख्या भामट्या पक्षाला सत्तेवर येऊ द्यायचं नाही म्हणून महाविकास आघाडी स्थापन केली. मात्र, नागपूर अधिवेशनामध्ये जी कर्जमाफी केली त्या कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना झाला नसल्याचे शेट्टी म्हणाले.
ठाकरे सरकारने केलेली कर्जमाफीमध्ये १० ते १५ टक्के शेतकरी त्यामध्ये सापडले नाहीत. राज्यातील सर्वाधिक दुष्काळी जिल्ह्यामध्ये अशी अवस्था असेल तर कर्जमाफी कोणाला? ही नुसती गंडवागंडवी झाली. गेली दोन वर्षे दुष्काळात गेली. तर विहिरीत पाणी नाही आणि वीज बिल भलेमोठे आले कसे, दुसऱ्यांनी वीज वापरायची आणि बिले आम्ही भरायची, याचा जाब विचारायला शिका, असेही ते यावेळी म्हणाले.