ऑनलाइन लोकमत
घोटी(नाशिक), दि. 5 – शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ""महाराष्ट्र बंद""ला घोटी शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. आज सोमवार असल्याने शहरातील बाजारपेठ बंद असते. त्यामुळे या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळेल, असे अभिप्रेत असताना मात्र किरकोळ दुकाने बंद वगळता इतर सर्व व्यापार सुरळीतपणे सुरू होता.
शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी राज्यभरात पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला. या बंदला घोटी शहरातील व्यापाऱ्यांनी संमिश्र प्रतिसाद दिला. शहरातील बाजार समितीत मात्र आज शेतीमालाची एकही वाहन आले नाही.
कडेकोड पोलीस बंदोबस्त
दरम्यान या बंदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, बंदला हिंसक वळण लागू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने पुरेपूर खबरदारी घेत महामार्गावरील संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. जिल्हा पोलीस प्रमुख अंकुश शिंदे हे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
नाशिक येथे रविवारी झालेल्या किसान क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये शेतक-यांनी राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील शेतकरी अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. जिल्ह्यातील वडांगळी येथे आंदोलकर्त्या शेतक-यांनी फडणवीस सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर चांदवड येथे संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतक-यांचा ""महाराष्ट्र बंद"" उर्त्स्फुत प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला आहे.
लासलगाव-चांदवड रस्त्यावर शिवसेनेच्या वतीनं रास्तारोको करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे पंचायत समितीचे सदस्य शिवा सुराशे यांच्या सह 5 ते 6 शेतक-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. लासलगाव, चांदवड, ठेंगोडा येथील व्यापाऱ्यांनीही दुकाने 100 टक्के बंद ठेऊन संपला पाठिंबा दर्शवला आहे. तर नांदूर शिंगोटे, भोजापूर खोरे, दोडी, दापूर, मानोरी इत्यादी भागांत कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
https://www.dailymotion.com/video/x8451ii