मुंबई : शेती आणि कर्जाच्या समस्येबाबत गाऱ्हाणे मांडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी आले असताना पोलिसांकडून धक्काबुक्की झालेले शेतकरी महेंद्र देशमुख यांनी कृषीमंत्री यांच्याशी चर्चा करुनही विषय मार्गी लागत नसल्याने अखेर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तर शेतकऱ्यांना फक्त भाजपच न्याय देऊ शकतो, अशा भावना महेंद्र देशमुख यांनी भेटीत व्यक्त केली.
बँकेच्या कर्जमुक्तीच्या मागणीकडे स्थानिक पातळीवर दखल न घेतल्याने महेंद्र देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली होती. माध्यमांमध्ये ही बातमी येताच सरकारने या प्रकरणाची दखल घेतली होती. तर कृषीमंत्री दादा भुसे यांनी या शेतकऱ्याची भेट घेऊन चौकशीचे आदेश दिले होते.
मात्र कृषीमंत्री, तहसीलदार, बँक अधिकारी यांच्याशी खूप दिवस चर्चा करुनही हा विषय मार्गी न लागल्याने शेवटी महेंद्र देशमुख आपल्या लहान मुलीसह देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तर भाजप कार्यालयात देशमुखांनी फडणवीसांची भेट घेतली. या भेटीमुळे आपलं समाधान झाल्याचं शेतकरी महेंद्र देशमुख यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेतेच मला न्याय देऊ शकतील. अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना फक्त भाजप न्याय देऊ शकतं, असं देशमुखांनी सांगितल्याचं भाजप आमदार राम कदम म्हणाले.