'प्रत्येकाला मेहनतीचं फळ मिळतं' हे वाक्य अनेकदा अनेकांच्या तोंडून तुम्ही ऐकलं असेलच. या वाक्याला साजेसं यश एका मजुराच्या मुलाने मिळवलं आहे. हा मुलगा भारतीय अंतराळ संस्था इस्त्रोमध्ये वैज्ञानिक बनला आहे. त्याचं सर्व स्तरातून भरभरून कौतुक केलं जात आहे. कारण त्याच्यासाठी हे यश मिळवणं सोपं नव्हतं.
शेतात मजुरी करणाऱ्या आई-वडिलांच्या एकुलत्या एका मुलाने असं काही करून दाखवलं ज्याची कल्पना त्याला जन्म देणाऱ्या आई-वडिलांनी केली नसेल. पंढरपूरचा सोमनाथ माळी इस्त्रोमध्ये निवडला जाणारा महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थी आहे.
सोमनाथ नंदू माळी पंढरपूर तहसीलच्या सरकोलीचा राहणारा आहे आणि त्याने त्याचं शिक्षण ग्रामीण भागातील शाळेतच पूर्ण केलं. सरकारी शाळेपासून ते इस्त्रोपर्यंतचा प्रवास त्याने फारच कठिण परिस्थितींमध्ये पार केला आहे.
आपला मुलगा सोमनाथला शिकवण्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी शेतात मजुरी केली. सोमनाथ सध्या केरळच्या तिरूवनंतपुरममध्ये विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून निवडला गेला आहे. महाराष्ट्रातून अंतराळ केंद्रासाठी निवडण्यात आलेला तो एकमेव विद्यार्थी आहे.
सोमनाथ माळीच्या शिक्षणाबाबत सांगायचं तर त्याने प्रायमरी शाळेपासून ७ वी आणि सेकेंडरी स्कूलपासून १०वी पर्यंत आणि नंतर ११ वीत पंढरपूरच्या केबीपी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. २०११ मध्ये ८१ टक्के मिळवून तो बारावीत पास झाला आणि त्याने बी.टेक साठी मुंबईला प्रवेश घेतला.
नंतर IIT दिल्लीसाठी तो मेकॅनिकल डिझायनर म्हणून निवडला गेला आणि त्याला भारतातून GATE परीक्षेत ९१६ वं स्थान मिळालं. इथूनच त्याला एअरक्राफ्ट इंजिन डिझाइन करण्याची संधी मिळाली. सोमनाथला अखेर २ जूनला इस्त्रोमध्ये वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून निवडलं गेलं.