यवतमाळ : ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल आमंत्रित होत्या. मात्र, राजकीय दबावामुळे अखेर संमेलनाच्या आयोजकांनीच हे आमंत्रण रद्द केले. आता या वादावर पडदा पडला असून संमेलनाचे उद्घाटन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते करण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्यावरून वाद निर्माण झाला होता. यावर चर्चा करण्यासाठी साहित्य महामंडळ आणि घटक संस्थांची नुकतीच बैठक पार पडली. यामध्ये उदघाटक बदलल्यामुळे नयनतारा सहगल यांचे भाषण वाचून दाखविले जाणार नाही. सहगल यांच्या बदली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी उद्घाटक म्हणून बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला, असे महामंडळाच्या सदस्यांनी सांगितले.
वैशाली सुधाकर येडे रा. राजुर कळंब, जिल्हा. यवतमाळ असे उद्धाटनासाठी निवडण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांना दोन मुले असून तीन एकर शेती आहे. त्या अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून काम करतात.
शिवाय केवळ अधिकृत १० साहित्यिकांनी न येण्याविषयी कळवले आहे. रद्द झालेल्या दोन कार्यक्रमांऐवजी २ नवे परिसंवाद आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. संमेलन तुमच आमचं असल्याने बहिष्कार टाकलेल्या साहित्यिकांना पुन्हा सहभागी होण्याचे महामंडळाने आवाहन केले आहे.