ऑनालाइन लोकमतमुंबई, दि. 7 - जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांने आपल्या मागण्या मान्य कराव्या यासाठी संपाचे हत्यार उपसले आहे. संपाचा आजचा सातवा दिवस असून शेतकऱ्यांचा संप सुरुच आहे. कोणत्याही गोष्टीवर भाष्य करणारे कलाकार शेतकरी संपावर मात्र शांत दिसले. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना नाना पाटेकर यांनी सरकारवर प्रहार केला. ते म्हणाले, जो शेतकरी गळफास घेऊ शकतो तो उद्या गळफास देऊही शकतो. वाढत्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावं ज्यामुळे शेतकऱ्याला आधार वाटेल. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला जगण्यासाठी संप करावा लागतो ही बाब अत्यंत वाईट आहे. स्वामीनाथन आयोग शक्य तितक्या लवकर लागू करण्यात यावा, तसंच ज्या शेतकऱ्यांना खरंच गरज आहे त्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अशी आग्रही भूमिका नाना पाटेकर यांनी घेतली आहे. तर शेतकरी संपाचा फुटबॉल करू नका असे वास्तववादी वक्तव्य मकरंद अनासपुरे यांनी केलं आहे. नाना पाटेकर यांनी यावेळी फडणवीस सरकारला शेतकऱ्यांच्या ज्या योग्य मागण्या असतील त्या मान्य कराव्या अशी विनंती केली. सरकारला हात जोडत असल्याचे नाना यावेळी म्हणाला. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी एकाच संघनेच्या नेतृत्त्वात आंदोलन व्हावे अशी अपेक्षाही नानाने व्यक्त केली.शेतकरी संपावर आज नाम फाऊंडेशनच्या वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली मते मांडली. यावेळी जलसंधारणाचं काम आणि नाम फाऊंडेशनने आत्तापर्यंत केलेले काम मकरंद अनासपुरे यांनी माहिती दिली. तसेच आम्ही कोणत्याही प्रसिद्धीसाठी हे करत नाही तर शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्याचं जगणं सुसह्य व्हावं ही एकमेव भावना आमच्या मनात आहे असं अनासपुरे यांनी म्हटलं आहे.
जो शेतकरी गळफास घेऊ शकतो, तो देऊही शकतो : नानांचा सरकारवर "प्रहार"
By admin | Published: June 07, 2017 4:58 PM