दासगांव : दरवर्षी शेतकरी रोहिणी नक्षत्र लागल्यानंतर शेतात भाताची पेरणी करतो. यंदा देखील पेरणी झाली. अचानक मोठ्या प्रमाणात एक दिवस महाड तालुक्यात पाऊस पडला. या पावसाच्या पाण्याने पेरणी केलेल्या भाताला रुज येवून तरवे वर आले. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने हे रुज करपत आहेत, मात्र शुक्रवारी पावसाच्या हलक्या सरी महाड तालुक्यातील काही भागात पडल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.१ जूनला दरवर्षी पावसाला सुरुवात होते. कोकणातील शेतकरी भात पेरणीपासून लावणी तसेच कापणी पावसाळी नक्षत्राप्रमाणे करतो. पेरणी ही पावसाच्या सुरुवातीचे नक्षत्र रोहिणी लागल्यानंतर दोन ते चार दिवसात सुरू केली जाते. रोहिणी नक्षत्र १५ दिवसांचे असते. शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे या नक्षत्रात भाताचे तरवे येण्याएवढा पाऊस दरवर्षी पडतो. नक्षत्राप्रमाणे ३ जून रोजी महाड तालुक्यात एक दिवसासाठी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. या एक दिवसाच्या लागलेल्या पावसामुळे जमिनीला ओल मिळाली आणि पेरणी केलेल्या भाताला रुज आले. भाताचे तरवे हिरवेगार दिसू लागले. आलेले रुज सध्या चार दिवस पडत असलेल्या कडक उन्हामुळे करपत आहेत. पुढे तीन चार दिवसात जर पावसाने हजेरी लावली नाही तर शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागणार अशा चिंतेत शेतकरी होता, मात्र महाडमध्ये काही ठिकाणी पाऊस पडल्याने शेतकरी समाधानी आहेत, आणि लवकरच आपल्याही भागात पाऊस पडेल या आशेने वरु णराजाच्या वाटेकडे डोळे लावून बसला आहे.तालुक्यात जवळपास ९० टक्के शेतकरी आहेत. मात्र यंदाही मागील वर्षासारखी पावसाने निराशा के ली तर शेतकरी अडचणीत येणार आहे. यंदा चांगला पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असून काही प्रमाणात पावसाने सुरुवात के ली आहे.।दुसऱ्या पेरणीसाठी भात नाहीजन्मापासून माझा व्यवसाय शेती आहे. माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच होतो. दरवर्षी रोहिणी नक्षत्र लागल्यानंतर पेरणी करतो. २५ मे रोजी नक्षत्र लागले. १ जूनला शेतात पेरणी केली. एक दिवसाच्या पावसामुळे भात रुजून वर आला आहे. दोन तीन दिवसात पाऊस लागला नाही तर तरवे करपणार आहेत. दुसऱ्या पेरणीसाठी माझ्याकडे भात नाही. - रमेश राणे, शेतकरी, दासगांव
भात रोपे करपल्याने शेतकरी चिंतेत
By admin | Published: June 11, 2016 3:24 AM