जव्हार : भौगोलीक दृष्ट्या डोंगरदऱ्या व चढउतार असलेल्या जव्हार तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना केवळ पावसाळी भात, नागली व वरई हीच शेती करता येते. तालुक्यात धरणे असले तरी कालवे नसल्यामुळे त्या धरणातील पाणी अन्य भागात पोहतच नाही. या वर्षी जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला होता. त्या पावसाळी पाण्यात त्याने रोपे तयार केली. भातशेतीची रोपे तयार होण्यासाठी २० ते २५ दिवसाचा कालावधी लागतो त्यानंतर ती रोपे तयार झाल्यानंतर शेतातील चिखलात त्या रोपांची लागवड केली जाते. डोंगर उतारावर साधारण नागला, वरई यांची शेती लागवड केली जाते. शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या रोपांनी नुकतेच मुळ धरलेले असताना पावसाने मारलेल्या दडीमुळे ही रोपे पुर्णपणे करपल्याने जव्हार तालुक्यातील शेतकरी अस्मानी संकटापुढे पुर्णपणे हतबल झाला असून यावर्षी खायचे काय? असा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.काही शेतकऱ्यांच्या शेतात अथवा त्यांच्या जमीनीवर विहीरी आहेत त्यांनी इलेक्ट्रीक मोटरद्वारे आपल्या शेतात पाणी नेऊन लागवड केलेली भात शेती वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु आटलेल्या विहिरीत केवळ जून महिन्यातील पावसाळ्याचे पाणी साठले होते. ते पुर्णत: शेतीसाठी वापरले व पुढील महिन्यात किरकोळ पाऊस पडला तर पुढे पिण्यासाठीदेखील पाणी शिल्लक राहणार नाही. त्यामुळे येथील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. कमावलेली पुंजी खर्च करून बसलो आता खायचे काय? रेशनचे धान्य देखील वेळेवर मिळत नाही? मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा? या विवंचनेत सध्या जव्हार तालुक्यातील शेतकरी आहे. वरूणराजाची पुन्हा कृपा झाली तरी काहीही उपयोग नाही कारण येथील शेतकऱ्यांना आता दुबार पेरणी करणे सुद्धा शक्य नाही. कारण जी रोपे तयार करावयाची असतात ती पावसातच व चिखलात, ती रोपे तयार होण्यासाठी आणखी २० ते २५ दिवस लागतात. भात, नागली, वरई यांना भरपूर पाणी लागत असल्याने वरूणराजाचा लहरीपणा लक्षात घेता आता तेही अशक्यच आहे.
शेतकरी झाला हवालदिल
By admin | Published: July 12, 2015 2:51 AM