अकोला: शेतकर्यांनी स्वत: आत्महत्या करण्यापेक्षा, आत्महत्येस प्रवृत्त करणार्या आमदार, खासदार, राज्यकर्ते व संबंधितांना सोबत घेऊन आत्महत्या करावी, असे प्रतिपादन भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केले.अकोला जिल्हा परिषदेत मोफत बियाणे वाटप कार्यक्रमानंतर अँड. प्रकाश आंबेडकर पत्रकारांशी चर्चा करताना बोलत होते. दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, अल्पभूधारक शेतकर्यांच्या बाजूने राज्य सरकार उभे राहिले नाही. हे सरकारचे अपयश असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला. अकोला जिल्हा परिषद सेस फंडातून जिल्ह्यातील अल्पभूधारक ३ हजार ५00 शेतकर्यांना कपाशीचे बियाणे मोफत वाटप करण्याची योजना राबवित आहे. शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी हाच कार्यक्रम राज्य सरकारने राबविला पाहिजे, असे ते म्हणाले. गुजरातमध्ये बीटी कपाशीचे बियाणे प्रतिपिशवी ३५0 रुपये दराने विकले जाते. तेच बियाणे महाराष्ट्रात एका खासगी कंपनीचे निशाण लावून प्रतिपिशवी ८00 रुपये दराने विकले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी बीटी कपाशी बियाणे विक्रीसंदर्भात राज्य सरकारने गुजरात सरकारच्या धोरणाचे अनुकरण केले पाहिजे, असेही अँड. आंबेडकर यांनी सांगितले.
शेतक-यांनो, राज्यकर्त्यांना सोबत घेऊन आत्महत्या करा!-प्रकाश आंबेडकर
By admin | Published: June 23, 2016 10:25 PM