भंडारा/बीड/अहमदनगर :
राज्यातील अघोषित भारनियमनाचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून शेतकरी आक्रमक झाल्याच्या अनेक घटना गुरुवारी राज्यात घडल्या. भंडारा जिल्ह्यात वीज वितरण उपकेंद्रावर हल्लाबोल करत तोडफोड केल्याची घटना घडली असून अहमदनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी एक तास रस्त्यावरच ठिय्या दिला, तर बीड जिल्ह्यात पक्ष, संघटनांनी वीज वितरण कार्यालयांपुढे आंदोलनाचा इशारा दिला आहे.
भारनियमनामुळे सिंचनात बाधा येत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वीज वितरण उपकेंद्रात तोडफोड केल्याची घटना पवनी तालुक्यातील आसगाव (भंडारा) येथे बुधवारी घडली. याप्रकरणी तीन गावांतील सुमारे दीडशे शेतकऱ्यांविरुद्ध पवनी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर उपकेंद्राला पोलीस संरक्षण देण्यात आले. आठ दिवसांपासून कृषी फिडरवर मोठ्या प्रमाणात भारनियमन होत असल्याने शेतकरी संतप्त आहेत.
लोडशेडिंगवरून बीडमध्ये संतापमहावितरणने अचानक सुरू केलेल्या लोडशेडिंगविरोधात जिल्हाभरात नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. वीज प्रश्नावर भाजपचे तीन आमदार आक्रमक झाले असून इतर पक्ष, संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. केज, अंबाजोगाई तालुक्यात वसुली चांगली आणि वीजचोरी नसताना भारनियमन का? असा सवाल आ. नमिता मुंदडा यांनी केला. गेवराईत आ. लक्ष्मण पवार यांनी ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले तर आष्टीत आ. सुरेश धस यांनीही आक्रमक पवित्रा घेतला. गेवराईत वंचित बहुजन आघाडीने आंदोलनाचा इशारा दिला.
बळजबरीने सुरू केला वीजपुरवठावीज वितरण उपकेंद्रात धडकलेल्या शेतकऱ्यांनी बळजबरीने वीजपुरवठा सुरू करण्यास कर्मचाऱ्यांना भाग पाडले. ११ केव्ही आसगाव, ढोलसर, खैरी कृषी फिडरवर वीजपुरवठा सुरू करून वाहिनी बंद केली, तर आम्ही पुन्हा येऊ आणि तोडफोड करू, अशी धमकी दिली.
शेतकऱ्यांचा तासभर रस्त्यावरच ठिय्या- शिरूर-जवळे-निघोज मुख्य रस्त्यावर जवळे (ता. पारनेर) येथील बसस्थानकासमोर वीजप्रश्नी शेतकऱ्यांसह भाजपच्यावतीने एक तास रस्त्यावरच ठिय्या देण्यात आला. आंदोलनात पारनेर तालुक्यातील शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. - भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे म्हणाले, भारनियमनासाठी आघाडी सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत आहे. विहिरीत पाणी असूनही वीजटंचाईमुळे शेतकऱ्यांची उभे पिके जळून चालली आहेत. आठ दिवसांच्या आत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास पुणे-नगर महामार्ग गव्हाणेवाडी आम्ही शेतकऱ्यांसह रोखण्याचा इशारा कोरडे यांनी दिला.