मुंबई – कांदा निर्यातीवरील शुल्क वाढवल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. आता केंद्राने कांदा निर्यातीवरील शुल्क मागे घ्यावेत या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. विरोधकांनीही या मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरले आहे. त्यात सरकारमधील घटकपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनीही या निर्णयावरून संतप्त भूमिका घेतली आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले की, सरकारने ४० टक्के निर्यात शुल्क वाढवल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. कांद्याला दोन पैसे जास्त मिळत असताना हा निर्णय झाला. शेतकऱ्याने शेती करायची की नाही हे सरकारने धोरण तयार करावे. शेतकऱ्यांचा शेतमाल फुकट खायचा असेल तर शेतजमीन सरकारने ताब्यात घ्यावी आणि मंत्रालयातील क्लार्कप्रमाणे शेतकरी कुटुंबाला महिन्याला पगार द्यावा. ते जमणार नसेल तर शेतकऱ्याला गांजा, अफू लावायची परवानगी द्या. आम्ही धान्य पिकवायचे बंद करतो, तुम्हाला कुणाच्या शेतात धान्यपिके पिकवायची असेल तिकडे पिकवा असं त्यांनी म्हटलं.
तसेच जर कांद्याचा भाव वाढला तर कांदा खाऊ नका. कांदा नाही खाल्ला तर कुणी मेलंय का? ज्या ज्या वेळी २ पैसे शेतकऱ्याला जास्त मिळाले तर शेतकऱ्याचे खळे त्याच्या डोळ्यादेखत लुटलं जातंय हे कुठेतरी बंद व्हायला हवे. रयत क्रांती संघटनेच्या वतीने माजी प्रदेशाध्यक्ष दिल्लीत गेले, ते उद्या निवेदन देतील. परंतु पुढील महिन्यात आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नाशिकपासून आंदोलनाला सुरुवात करतोय असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला. दरम्यान, सरकारला या शेतकऱ्याला काही देता येत नसेल तर देऊ नका, परंतु त्याच्या अन्नामध्ये कृपा करून माती कालवू नका असं आवाहन सदाभाऊ खोत यांनी सरकारला केले.
परवडत नसेल तर कांदा खाऊ नका - मंत्री
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन सुरू केले आहे. केंद्र शासनाने निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळे गेल्या दोन दिवसापासून कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. निर्यात शुल्क वाढीमुळे कांदा दर कोसळतील ही भीती व्यापारी आणि शेतकऱ्यांना असल्याने बेमुदत संप पुकारला आहे. ही संपाची कोंडी सोडण्यासाठी राज्य सरकार- केंद्राशी चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. मात्र, यावेळी बोलताना त्यांनी अजबच सल्ला दिला. परवडत नसेल तर कांदा खाऊ नका, असेच भुसे यांनी म्हटले.