ऑनलाइन लोकमत
अधार्पूर (जि. नांदेड), दि. 9 - शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी आम्ही आता संपावार जाऊ. माय-बाप शासनाने आमच्याकडे जरा लक्ष द्यावे, अशा भावना व्यक्त करुन संपावर जाण्याचा ठराव तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकमताने केला असून यासाठी महीनाभर विविध माध्यमातून प्रचार करणार आहेत. तसेच सात जूनला नांदेड जिल्ह्यात राज्यातील पहिला शेतकरी क्रांती मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला.
राज्यातील विविध भागातील शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर जाण्याच्या तयारीत असून तसे ठराव करीत आहेत. हे संपाचे लोण नांदेड जिल्ह्यात आले असून पहिली बैठक अधार्पूर शहरात घेण्यात आली. या बैठकीला क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी विविध विषयावर चर्चा केली. शेती व शेतकऱ्यांसमोरील ज्वलंत प्रश्नावर चर्चा होऊन ठराव पारीत करण्यात आले.
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, विज व पाणी मोफत देणे, शेतीमालाला उत्पादन खचार्वार आधारीत भाव देणे, आरोग्य सेवा व उच्च शिक्षण मोफत देणे, शेतकरी विरोधी कायदे रद्द करुन शेतकरी हित जोपासणारे कायदे करणे, शेतीमाल आयातीवर बंदी घालून निर्यात वाढविणे आदी मागण्यासंदर्भात ठराव पारीत करण्यात आले. या मागण्या मान्य न केल्यास कालबद्ध पद्धतीने आंदोलन करण्याचा ठराव करण्यात आला. आमच्या अनेक पिढयानी शेती केली, पण आमच्या शेती मालाला योग्य भाव मिळाला नाही. आमच्या आजच्या परीस्थितीला शेतकरी विरोधी धोरण कारणीभूत ठरले आहे. यंदा पेरणीच करायची नाही आणि भाजीपाला, दूध,फळे, शहराला पुरवायची नाहीत, असेही ठरवण्यात आले.
यात एक जून ते सात जून या काळात फळे आणि भाजीपाला विक्री बंदी, मृग नक्षत्रावर शेतकरी क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास पेरण्या करण्यात येणार नाहीत. असा ठराव करण्यात आला. यासाठी गावोगावी जावून ग्रामसभा, बैठका, चौकसभा यासह विविध माध्यमातून प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे. या बैठकीला संतोष गव्हाणे, सुरेश भालेराव, दादाराव शिंदे, बाबुराव हेंद्रे, नासेरखान पठाण, राजेश्वर शेटे, पंडीतराव लंगडे, हरीभाऊ कोंडेकर, दिगंबर धुमाळ, सुनील बोबडे, भगवान कदम, व्यंकटी साखरे, व्यंकटी राऊत, रावसाहेब गाडे, साहेबराव लोखंडे, कपिल कोंडेकर, गोविंद गाडे, गजानन कदम, नवनाथ ढगे, राम लांडगे, नारायण कदम, गंगाधर धुमाळ, उत्तमराव बरगळ, पंडीतराव शेटे, भाऊराव खराटे, चित्रांगण लडे, शंकर लडे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)