Sharad Pawar vs PM Modi ki Guarantee: आश्वासन, टीका-टीप्पण्णी करणं या पलिकडे सरकारने काय केलं आहे? शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आलीय, हीच मोदींची गॅरंटी आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली. लोणावळा येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी भाजपा सरकारवर तोंडसुख घेतले. "लोकशाहीला संकटात नेणारा कारभार मोदींकडून सुरू आहे. सामान्य माणसांचे अधिकार उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे लोकशाही आणि घटनेचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे, तुम्ही सर्वांनी यात सहभागी व्हायला हवे," असे आवाहनही शरद पवार यांनी केले.
"पक्ष स्थापनेपासून आम्ही विचारधारा कधीच बदलली नाही. जवाहरलाल नेहरुंबद्दल काहीही बोललं जातं आहे. गांधी, सुभाषबाबू, जवाहरलाल नेहरू यांचं योगदान हा देश स्वतंत्र करण्यासाठी होतं. अशा लोकांची नोंद जाणकारांनी घ्यायची असते. आज देशाचे पंतप्रधान प्रत्येक दिवशी पूर्ण पान जाहिरात देत आहेत. त्याच मोदींची गॅरंटी देत आहेत, पण ही कोणाच्या पैशाने जाहीरात दिली जात आहे. आज ते सांगत आहेत की शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढवतो. गेली दहा वर्षे मोदी सत्तेत आहेत, उत्पन्न वाढलं का? उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आणली, हीच मोदींनी गॅरंटी दिली," असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.
शरद पवार म्हणाले, "मविआची बैठक झाली आहे. पुढील आठवडाभरात आम्ही लोकसभेचे उमेदवार जाहीर करू. तुम्ही त्या उमेदवारांना निवडून द्या, तेव्हाच लोकशाहीचे रक्षण होईल असे आवाहन त्यांनी केले. सत्तेचा गैरवापर भाजप करत आहे. झारखंड, दिल्ली या राज्यात तेच घडत आहे. नोटीस, समन्स द्यायचे आणि तुरुंगात टाकायचे, आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही लवकरच अटक केली जाईल."
"मुंबईत आदर्श सोसायटीमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा हात आहे, असा आरोप भाजपाने केला. सातव्या दिवशी ते भाजपामध्ये गेले आणि पंधराव्या दिवशी ते भाजपाचे खासदार झाले. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भ्रष्टवादी पक्ष मोदींनी राज्य सहकारी बँक आणि जलसंपदा विभागात घोटाळा केला, असा आरोप मोदींनी केल्यावर मी म्हणालो हिंमत असेल, तर चौकशी करा. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ दे. मोदींनी चौकशी करावी. मात्र घडलं काय, ज्यांच्यावर आरोप केले, आज ते भाजपामध्ये आहेत. त्यामुळे भाजप म्हणजे वॉशिंग मशीन झालेली आहे. आरोप करा आणि त्यांना पक्ष प्रवेश देऊन आरोप धुवून काढा," असेही शरद पवार अधोरेखित केले.