घोलवड : बैलजोडीच्या वाढत्या किंमतीमुळे शेतकरी हैराण झाले असून आता यांत्रिकी शेतीवर शेतकऱ्यांचा भर आहे. त्यामुळे पारंपारिक नांगर इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. बैलजोडी घेण्यासाठी शेतकऱ्यांना ४० ते ५० हजार मोजावे लागत आहे.पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकरी उपयुक्त अवजारांची दुरुस्ती करीत आहेत. बी-बीयाणे, किटकनाशके, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांनी बाजारपेठेत सध्या गर्दी केली आहे. महागाई वाढली तरी शेतकऱ्यांना शेती हाच पर्याय असल्याने शेतीसाठी लागणारे साहित्य तसेच बैलजोडी खरेदी करताना त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. यातच बैलजोडीच्या किंमती सामान्य शेतकऱ्यांना परवडत नसल्याने तो त्रस्त झाला आहे.काही भागात ट्रॅक्टरचा पर्याय उपलब्ध असला तरी ग्रामीण डोंगराळ भागात मात्र नांगर हा शेतीसाठी एकमेव पर्याय आहे. बहुतेक शेतकरी बैलजोडीच्या मदतीने मशागतीचे काम करीत आहेत. मात्र जनावरांच्या पालन पोषणाचा खर्च अधिक आहे. त्यातच महागाईचा फटका त्यांना बसत आहे. त्यामुळे शेतकरी बैलांना पाळण्याऐवजी यंत्राद्वारे शेती करीत आहेत.बैलांची मागणी वाढल्यामुळे त्यांच्या किमतीतही प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. बैलजोडीसाठी ४० ते ५० हजार मोजावे लागत आहे. पूर्वी शेतीची मशागत करण्यासाठी नांगराशिवाय दुसरा पर्यायच नव्हता परंतु आता काळानुसार शेतकऱ्यांना मशागतीच्या पद्धतीत बदल करीत आहेत. (वार्ताहर)
बैलजोडीच्या वाढत्या किंमतीमळे शेतकरी त्रस्त
By admin | Published: June 16, 2015 11:23 PM