धनादेश न वठल्याने संताप : कार्यालयाची मोडतोड, निदर्शनेऑनलाइन लोकमतसांगली, दि. २५ : वसंतदादा कारखान्याची २0१३-१४ व २0१४-१५ या वर्षातील उसाची बिले थकीत असल्याने व दिलेले धनादेश न वठल्याने सोमवारी शेतकऱ्यांनी हल्लाबोल केला. खिडक्यांच्या काचा फोडून कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. कारखान्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत दिवसभर ठिय्या मांडला. पुढील सोमवारचा धनादेश कारखाना प्रशासनाने दिल्याने आंदोलन शांत झाले. वसंतदादा कारखान्याच्या थकीत ऊसबिलाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून गाजत आहे. कार्यक्षेत्रातील शेतकरी आक्रमक होऊ लागल्यानंतर कारखाना प्रशासनाने त्यांना धनादेश दिले होते. शेकडो धनादेश न वठल्याने शेतकरी संतप्त बनले. त्यांनी सोमवारी सकाळी कारखान्यावर येऊन हल्लाबोल केला. कार्यालयाला कडी घालून ते बंद करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर काही संतप्त शेतकऱ्यांनी खिडक्यांच्या काचा फोडल्या. त्याचवेळी पोलिस दाखल झाले. त्यांनी शेतकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. १ आॅगस्टचे धनादेश लिहून दिल्यानंतर शेतकरी शांत झाले. पुढील धनादेश न वठल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.