शेतकऱ्यांचा ‘भारत बंद’ हे जनतेचे आंदोलन; काँग्रेस शेतकऱ्यांसोबत - बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 06:17 PM2020-12-08T18:17:01+5:302020-12-08T18:18:09+5:30

Balasaheb Thorat : भारत बंदला पाठिंबा देत काँग्रेसने पुकारलेल्या आंदोलनाला राज्यात जिल्हा, ब्लॉक स्तरावरही चांगला प्रतिसाद मिळाला.

Farmers' 'Bharat Bandh' is a mass movement; Congress with farmers - Balasaheb Thorat | शेतकऱ्यांचा ‘भारत बंद’ हे जनतेचे आंदोलन; काँग्रेस शेतकऱ्यांसोबत - बाळासाहेब थोरात

शेतकऱ्यांचा ‘भारत बंद’ हे जनतेचे आंदोलन; काँग्रेस शेतकऱ्यांसोबत - बाळासाहेब थोरात

Next
ठळक मुद्देथोरात म्हणाले की, शेतकरीविरोधी कायद्यांमार्फत जनतेचे अन्न ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न आहे.

मुंबई : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधातील भारत बंदला पाठिंबा देत काँग्रेसने राज्यभर आंदोलन केले. हे कायदे शेतकरी हिताचे नसून मुठभर धनदांडगे, उद्योगपती, साठेबाज यांच्या फायद्याचे असून यातून शेतकरी व ग्राहक दोघांचेही नुकसानच होणार आहे. कोणतीही चर्चा न करता, खासदारांना निलंबित करुन हुकुमशाही पद्धतीने हे कायदे आणले गेले आहेत. या कायद्यांविरोधात देशभर आक्रोश असून शेतकऱ्यांचे हे आंदोलन आता जनतेचे आंदोलन झाले आहे, कायदे रद्द केल्याशिवाय ते थांबणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या मुंबईतील पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रातील भाजपा सरकारच्याविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. थोरात यांच्याबरोबर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, माजी मंत्री नसीम खान, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन, मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड, माजी मंत्री सुरेश शेट्टी, चंद्रकांत हंडोरे, आ. भाई जगताप, आ. कुणाल पाटील, आ. धीरज देशमुख, आ. राजेश राठोड, आ. ऋतुराज पाटील, आ. अभिजीत वंजारी, सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, राजेश शर्मा, रामकिशन ओझा, सचिव राजाराम देशमुख, यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, शेतकरीविरोधी कायद्यांमार्फत जनतेचे अन्न ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न आहे.

शेतकऱ्यांना अडचणीत आणून शेतमाल स्वस्तात खरेदी करण्याचे आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या नष्ट करण्याचे काम भाजप सरकार करत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन होत आहे. या कायद्याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात काही शंका आहेत, त्यांच्या मनात भीती आहे ती सरकारने दूर करावी. पण भारतीय जनता पार्टी खोटी माहिती देऊन जनतेची, शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. काँग्रेसची भूमिका ही नेहमीच शेतकरी, सामान्य जनतेला आधार देण्याची, त्यांना मदत करण्याचीच राहीली आहे. काँग्रेसवर भाजपा करत असलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, दीडपट हमी भाव देऊ या आश्वासनाचे काय झाले हे भाजपाने जनतेला सांगावे.     

भारत बंदला पाठिंबा देत काँग्रेसने पुकारलेल्या आंदोलनाला राज्यात जिल्हा, ब्लॉक स्तरावरही चांगला प्रतिसाद मिळाला.

Web Title: Farmers' 'Bharat Bandh' is a mass movement; Congress with farmers - Balasaheb Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.