कोल्हापूर - राज्य सरकारने शेतीच्या पाणीपट्टीत दहापटीने दरवाढ केली असून कृषी पंपाना जलमापक यंत्र (पाणी मीटर) बसविले जाणार आहेत हे निर्णय तातडीने मागे न घेतल्यास मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना पंचगंगा आणि कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला .
शिरोली येथे महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीने कोल्हापूर सांगली व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्याने जुलमी वाढीव पाणीपट्टीविरोधात पुणे बेंगलोर महामार्ग रास्ता रोको आंदोलन छेडले होते. यावेळी त्यांनी इशारा दिला. आंदोलनस्थळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी अभिजित मेहत्रे यांनी जलसंपदा विभागाचे पत्र घेऊन सरकारने याबाबत ६ जून रोजी बैठकीचे लेखी आश्वासन दिले. यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेऊन ६ तारखेनंतर पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करण्याचे ठरले.
यावेळी शेट्टी म्हणाले दसपट वाढीव पाणीपट्टी करणारे सरकार एफ. आर. पी मध्ये तोडमोड करून तुकड्याने शेतक-यांना ऊस बिले अदा करत आहेत याबाबत सरकार मुग गिळून गप्प बसले असून पाणीपट्टी मात्र एक रक्कमी वसुलीचा तगादा लावला आहे. यावेळी आमदार अरुण लाड म्हणाले आम्हाला आंदोलन करु नका असे मंत्रालयातून दबाव आणला गेला. मुंबई पासून फोन येत होता. आज हजारो शेतकरी कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातून आले आहेत. उन्हात रस्त्यावर आंदोलनात सहभागी झाले आहेत. ज्यांना शेती माहिती नाही अशांची आज सत्ता आहे, ज्यांना शेती माहिती नाही असे आधीकारी आणून बसवले आहेत आणि शेतकऱ्यांना छळण्याचा प्रयत्न सुरू आहे.
आमदार सतेज पाटील म्हणाले काल मंत्रालय स्तरावर चर्चा झाली. ६ जून रोजी मंत्रालयात बैठक घेऊन सन्मानजन्य तोडगा काढू असे पत्र आले आहे. एका बाजूला शासनाच्या योजनांच ८१ टक्के बिल शासन भरत. आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था आहेत तिथे दरवाढ करायची हे अन्याय कारक आहे. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर म्हणाले शेतीला हेक्टरी १३०० ऐवजी १३००० रुपये पाणीपट्टी आकारली आहे. पाणी पट्टी भरलीनाही तर पाणी नाही हा कुठला कायदा काढला. शेतकरी आहे म्हणून तुम्ही आहात. शेतकऱ्यांला डिवचले तर तुम्हाला महागात पडेल.
यावेळी माजी आमदार संजय घाटगे, इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी यांची भाषणे झाली. यावेळी बाबासाहेब देवकर, जे. पी. लाड,भारत पाटील-भुयेकर, शशिकांत खवरे, एस.एम. क्षीरसागर, देवराज पाटील, प्रदिपराव पाटील,चंद्रकांत पाटील-पाडळीकर, महादेव सुतार, विश्वास पवार व सचिव मारुती पाटील, यांच्यासह सांगली सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने ऊपस्थित होते. चौकट : मिटर बसवण्याचा घाट कशाला... महाराष्ट्र शासनाला मिटर बसवणारा ठेकेदार भेटला असेल त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या माथी मिटर बसवण्याचा घाट घातला असेल असे आमदार सतेज पाटील म्हणाले. ६ जून रोजी मुंबईत मंत्रालयात जलसंपदा विभागाचे सचिव संजीव कुमार यांच्या सोबत बैठक होणार असून त्यात ही जाचक पाणी पट्टी दरवाढ मागे घेतली नाही तर पुन्हा तिव्र आंदोलन छेडणार. असे विक्रांत पाटील म्हणाले.