देउळगाव साकर्शा (बुलडाणा): भुईमुगाच्या पिकाला पाणी देण्याचे आश्वासन पाटबंधारे विभागाने पूर्ण न केल्याने, शेतकर्यांनी उतावळी प्रकल्पाचे कुलूप तोडून पाणी सोडल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.शेतकर्यांना भुईमुगाच्या पिकाची चिंता भेडसावत आहे. मेहकर तालुक्यातील देउळगाव साकर्शा येथील उतावळी प्रकल्पामध्ये डिसेंबर २0१५ मध्ये १0.७२ दलघमी पाणी साठा उपलब्ध होता. त्यावेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी परिसरातील २00 शेतकर्यांची बैठक घेऊन, उतावळी धरणातून 0.५0 दलघमी आरक्षीत पाणी भुईमुगाच्या पिकासाठी सोडून उर्वरित पाणी शेतकर्यांना देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी संबंधित शेतकर्यांकडून ८0 हजार रुपयांचा भरणाही अधिकार्यांनी करून घेतला होता; परंतु कराराप्रमाणे पाणी मिळत नसल्याने पीक नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने जवळपास १५0 शेतकर्यांनी धरणाच्या दरवाजाचे कुलूप तोडून पाणी घेतल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. खामगाव पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता एस.एन.टाले यांनी जानेफळ पोलीस स्टेशनला यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. पंचनामा केल्यानंतर याप्रकरणी पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.
शेतक-यांनी उतावळी प्रकल्पाचे कुलूप तोडून पाणी सोडले!
By admin | Published: April 10, 2016 1:40 AM