जळगाव, दि. १३ - कर्जबाजारी शेतक-याने स्वत:चे सरण रचून जाळून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील सबगव्हाण येथे उघडकीस आली आहे. कर्जबाजारीपणास कंटाळून या शेतकर्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जाते.शनिवारी रात्री ९.३0 वाजेच्या सुमारास नामदेव मरा पाटील (७0 ,रा. सबगव्हाण ता. अमळनेर) यांनी स्मशानभूमीत सरण रचून त्यावर जाळून घेतले. रात्रीच्या सुमारास स्मशानभूमीजवळ अमृताबाई नामदेव पाटील यांच्या शेतात आग लागल्याची माहिती गावात कळाली. त्यानंतर गावातील काही लोक व पोलीस पाटील घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी सरणावर एक वृद्ध जळत असल्याचे आढळून आले. पोलीस घटनास्थळी आल्यावर ग्रामस्थांच्या मदतीने पोलीस पाटलांनी जळालेल्या व्यक्तीला बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता, शिवाय या व्यक्तीची ओळखली पटली नव्हती.रविवारी सकाळी मारवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी पुन्हा घटनास्थळ गाठले. सरण तारांनी बांधलेले त्यांना आढळून आले. अधिक चौकशी केल्यानंतर शेतमालक नामदेव पाटील हे शनिवारी मुंदाणे येथे मुलीकडे गेल्याचे सांगण्यात आले. मात्र ते मुंदाणे येथे पोहचलेच नव्हते. शेतातील झोपडीवजा घरात त्यांचे आधारकार्ड, पैसे व रॉकेलचा डबाही पडलेला होता. त्यावरून त्यांनीच आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. पाटील यांच्यावर सोसायटीचे ३५ हजार रूपये कर्ज असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुलगी असा परिवार आहे. पोलीस पाटील भाऊसाहेब पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. (प्रतिनिधी)
स्वत:चे सरण रचून शेतक-याने जाळून घेतले
By admin | Published: June 13, 2016 7:59 AM