लोकमत न्यूज नेटवर्कमुखेड (जि़. नांदेड) : कर्जबाजारी पित्याच्या मृत्यूनंतर आपलीही या कर्जाच्या जोखडातून सुटका होणार नाही या विवंचनेत अपंग असलेल्या मुलानेही तासाभरातच वीजप्रवाहास स्पर्श करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मुखेड तालुक्यातील होकर्णा येथे घडली.व्यंकटी विठोबा लुट्टे (७०) आणि नागनाथ व्यंकटराव लुट्टे (४०), अशी या पितापुत्राची नावे आहेत. अल्पभूधारक शेतकरी व्यंकटी लुट्टे यांच्यावर बँक आणि खासगी सावकाराचे कर्ज होते़ त्यातच अर्धांगवायू झाल्याने उपचारासाठी अनेक जणांकडून पैसे उसने घेतले होते़ तर, घरातील कर्ता मुलगा नागनाथ याचा मोटारसायकलवरून पडून पाय मोडला़ त्याच्या उपचारासाठी पुन्हा कर्ज काढले, परंतु नागनाथला कायमचे अपंगत्व आल्याने लुट्टे कुटुंबियांच्या उरल्यासुरल्या आशाही मावळल्या.शनिवारी सायंकाळी व्यंकटी लुट्टे यांचा मृत्यू झाला़ सर्व कुटुंबीय शोकसागरात बुडालेले असताना, नागनाथला मात्र वडिलांवर असलेले बँकेचे कर्ज आणि उसनवारी कशी फेडायची, या चिंतेने ग्रासले होते़ यापुढे कुटुंबाचा उदरनिर्वाह आपण करू शकणार नाही, या विचारातच नागनाथने घराशेजारील सार्वजनिक विद्युत डीपीतील तारेला स्पर्श केला आणि विजेच्या जबर धक्क्याने त्याचा मृत्यू झाला़ नागनाथ याच्या पश्चात आई, दोन लहान भाऊ, एक मुलगा, एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे.
शेतकऱ्याच्या मुलाची आत्महत्या
By admin | Published: July 17, 2017 1:56 AM