ऑनलाइन लोकमत
अहमदनगर/सोलापूर, दि. 6 - शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोग लागू करावा आणि शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, या मागण्यांसाठी राज्यातील शेतकरी आक्रमक झाला आहे. १ जूनपासून शेतक-यांचं राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. आज शेतक-यांनी टाळेठोक आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाद्वारे शेतकरी जिल्ह्यातील सरकारी कार्यालयानं कुलूप ठोकत आहेत.
अहमदनगर
पारनेर तालुक्यातील निघोजमध्ये तलाठी कार्यालयाला शेतक-यांनी टाळे ठोकले. शिवाय वडनेर येथे बस पेटवण्याचाही प्रयत्न केला.
सोलापूर
शेतक-यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. तर पंढरपुर तहसिल कार्यालयसमोर शेतकरी संघटनेने घोषणाबाजी करत कार्यालयाला टाळं ठोकले.
दुसरीकडे पानगावच्या शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालय बंद करून आंदोलन केले.
पुणे-विजापूर बायपास महामार्ग कुरूल येथे जनहित शेतकरी संघटनेने रास्तारोको केला. दुधाचे कॅन-जनावरांसहीत शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. यामुळे दोन्ही बाजूंना 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
सांगली
शेतकरी संघटनेसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी नूतन प्रशासकीय इमारतीस टाळे ठोकून आंदोलन केले. यावेळी अनुचित प्रकार घडून नये म्हणून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
कोल्हापूर
शिये येथील तलाठी कार्यालय शेतक-यांनी बंद केलं.
अमरावती
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता व जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांचे घरासमोर शेतमाल फेकून निषेध नोंदवला. या आंदोलनात सहभागी झालेल्या सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
(शेतकरी संपातील पहिली आत्महत्या, कर्जबाजारी तरुण शेतक-यानं संपवली जीवनयात्रा)
राज्यव्यापी शेतकरी संपाचा विषय तापलेला असताना एका तरुण शेतक-यानं कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतक-यांचा संप या आत्महत्येमुळे अधिक चिघळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ज्या शेतक-यानं आत्महत्या केली आहे, त्यानंही ""महाराष्ट्र बंद""मध्ये सक्रिय सहभाग नोंदवला होता.
नवनाथ चांगदेव भालेराव असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव असून ते 30 वर्षांचे होते. सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास विष पिऊन त्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आयुष्य संपवल्याची माहिती मिळत आहे. येवला लासलगाव रोडवरील पिंपरी फाटा येथे सोमवारी पुकारण्यात आलेल्या शेतकरी आंदोलनात नवनाथ यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता.