लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारच्या काळात बांधावरील शेतकरी आणि सीमेवरील सैनिकांच्या वाट्याला रोजचे मरण आले आहे. मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून, निवडणुकीतील एकही आश्वासन या सरकारला पूर्ण करता आले नसल्याची टीका, शुक्रवारी अखिल भारतीय काँग्रेसचे प्रवक्ते आणि माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आर. पी. एन. सिंह यांनी केली. मुंबई काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सिंह यांनी मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कामकाजाचा समाचार घेतला. या वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष संजय निरूपम, प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत आदी नेते उपस्थित होते. सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली, म्हणून देशभर भाजपाकडून जल्लोष सुरू आहे. त्तमोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे रोज सीमेवर सैनिकांना जीव गमवावा लागत आहे. पाकिस्तान दररोज कुरापाती काढून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे, तर दुसरीकडे शेतकरीविरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्याही वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाचा जल्लोष जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टीका आर.पी.एन.सिंह यांनी केली.
‘मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे मरण’
By admin | Published: May 27, 2017 3:02 AM