मुंबई : नेत्यांनी केलेल्या बेधडक विधानांमुळे भाजपाला आज पुन्हा एकदा टीकेचा भडिमार सहन करावा लागला आहे. पक्षाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना फॅशन संबोधल्याने पक्षासमोरील अडचणीत भर पडली आहे. सगळ्याच आत्महत्या या बेरोजगारी किंवा उपासमारीमुळे होत नाहीत. हल्ली ही एक फॅशन झाली आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येणारी आर्थिक मदतसुद्धा राज्या-राज्यांत स्पर्धा बनली आहे, असे विधान शेट्टी यांनी केले. यावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजपाचे नेते किती असंवेदनशील आहेत, याचा हा पुरावा असल्याची टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. तर, पैशासाठीच आत्महत्या होत असतील तर शेट्टी यांनी आपल्या आत्महत्येची किंमत व वेळ जाहीर करावी, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. विधानाचा विपर्यास - शेट्टी आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा गोपाळ शेट्टी यांनी केला. जलशिवारसारख्या योजनांच्या माध्यमातून सरकार चांगले काम करीत आहे. शेतकऱ्यांपर्यंत अशा योजनांचा लाभ पोहोचायला थोडा अवधी लागेल. एक रात्रीत आत्महत्या थांबणार नाहीत. आघाडी सरकारने १५ वर्षांत आत्महत्यांचे सत्र रोखण्यासाठी काहीच उपाययोजना केल्या नाहीत. सध्या विविध राज्यांमध्ये केवळ आर्थिक मदत देण्याची स्पर्धा सुरू झाली आहे, असे आपल्याला म्हणायचे होते, चुकून फॅशन हा शब्द वापरला, शेतकऱ्यांचा कोठेही अवमान केलेला नाही.
शेतकऱ्यांच्या आत्महत्येस ठरविले फॅशन
By admin | Published: February 19, 2016 3:23 AM