कोल्हापूर : शेतकऱ्यांचे अपात्र कर्जमाफीचे तब्बल ११२ कोटी रुपये ‘नाबार्ड’कडे आठ वर्षे पडून राहिले. किमान हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर असते तर त्याचा त्यांना लाभ मिळाला असता तेव्हा ही मुळ रक्कम व त्यावरील १०० कोटी व्याज असे एकत्रित २१२ कोटी रुपये मिळावेत यासाठी लढा उभारण्याचा निर्णय सोमवारी येथे घेण्यात आला. जिल्हा बँकेतर्फे अपात्र कर्जमाफीसाठी झटलेल्या शेतकऱ्यांचा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रकरणी तातडीने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्याचेही ठरले. यापुढील न्यायालयीन लढाईचा सर्व खर्च बँकेने करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली व त्यास मुश्रीफ यांनी संमती दिली. ही रक्कम मिळायची असेल तर त्यासाठी केंद्र शासनाच्या बजेटमध्ये त्याची तरतूद व्हायला हवी. त्यासाठी स्वत: तिन्ही खासदारांना भेटणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.अपात्र कर्जमाफी विकास सेवा संस्था प्रतिनिधींची बैठक बँकेच्या आवारातील लॉनवर झाली. त्यास सेवा संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी याचिकाकर्ते शेतकरी सर्वश्री शिवगोंड पाटील, प्रकाश तिप्पण्णावर, रामचंद्र मोहिते, अशोक नवाळे,दत्तात्रय पाटील, प्रकाश पाटील यांचा मुश्रीफ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले,‘या प्रकरणात अन्याय कागलनेच केला व न्यायही कागलनेच मिळवून दिला. आम्ही ज्यांची कर्जमाफी अपात्र ठरविली त्यांच्या बाजूने उतरलो म्हणून चोर ठरविले गेले. ‘कम’पेक्षा अनेक वर्षापासून जास्त पीककर्ज घेतो व त्याची परतफेड करत आलो आहे. हे कर्ज आमच्याच नावावर असते; परंतू प्रशासकांच्या काळातच शेतकरी विरोधातील माहिती ‘नाबार्ड’ला पुरवली गेली. प्रशासकीय कारकीर्द संपल्यानंतर बँकेने चुकीचे प्रतिज्ञापत्र बदलून दिले.’ बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांनी या कर्जमाफीतील शेतकऱ्यांची माहिती विशिष्ट नमुन्यात सचिवांनी वेळेत सादर करण्याची सूचना केली. यावेळी माजी खासदार निवेदिता माने यांचेही भाषण झाले. बैठकीस बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, भैया माने, उदयानी साळुंखे, बाबासाहेब पाटील, तसेच ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, आर. के. पोवार, धैर्यशील पाटील उपस्थित होते. विलास गाताडे यांनी आभार मानले.मंडलिक-शेट्टींवर टीकेचा भडीमार..या बैठकीत दिवंगत नेते माजी खासदार सदाशिवराव मंडलिक व खासदार राजू शेट्टी यांच्यावर मुश्रीफ, के. पी. पाटील यांनी नाव न घेता बोचरी टीका केली. निवेदिता माने यांनी मात्र ताकाला जावून मोगा कशाला लपवायचा, असे म्हणत शेट्टी यांनी याप्रकरणी संसदेत आवाज उठवला होता, अशी टीका केली. मुश्रीफ यांचे कौतुकया बैठकीत याचिकाकर्त्या सहाही जणांनी बँकेचे अध्यक्ष मुश्रीफ यांनी पाठबळ दिल्यामुळेच आम्ही न्यायालयीन लढाई करू शकलो, असे सांगत त्यांचे तोंडभरून कौतुक केले. त्यांच्यामुळेच आम्हाला पहिल्यांदा विमानात बसायची संधी मिळाल्याचे तिप्पण्णावर यांनी सांगितल्यावर हशा पिकला.कोल्हापुरात सोमवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बैठकीत अपात्र कर्जमाफी परत मिळवून देण्याऱ्या शेतकऱ्यांचा अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बाबासाहेब पाटील, भैया माने, उदयानी साळुंखे, निवेदिता माने, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, आर. के. पोवार आदी मान्यवर उपस्थित होते.
अपात्र कर्जमाफीचे व्याजासह २१२ कोटी देण्याची शेतकऱ्यांची मागणी
By admin | Published: February 07, 2017 1:03 AM