बारामती (जि. पुणे) : सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. पाण्याचा अपव्यय होत आहे. केवळ नियोजन नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो. शेतकरी अगोदरच अडचणीत आहे. त्यांच्यासाठी कर्जमाफी मागितली, त्यावर निर्णय घेत नाहीत. शिल्लक पाण्याचे नियोजन होत नाही. सरकारला शेतकऱ्यांची आस्थाच नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांनी मंगळवारी केली. बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा, तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, उपसभापतींचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या धोरणावर टीका केली. ‘आम्ही सत्तेत असताना पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचे नियोजन करत होतो. आता नियोजनअभावी धरणे कोरडी पडत आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय.’ हे या सरकारला कळत नाही, असे पवार म्हणाले. केंद्र व राज्य सरकारने विजेचे दर वाढविले. अगोदर शेतकरी पिचला आहे. त्यासाठी आम्ही संघर्ष यात्रेद्वारे कर्जमाफी द्या, अशी मागणी करीत आहोत. मात्र, मुख्यमंत्री म्हणतात, योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी देणार. कर्जमाफी केल्यावर आत्महत्या होणार नाहीत, याची हमी कोण देणार? दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपिटीची हमी, मुख्यमंत्री देणार का, असा टोलाही त्यांनी लगावला. (प्रतिनिधी)कच्ची साखर आयात कशासाठी!सहकारी साखर कारखान्यांनी कर्ज काढून एफआरपी दिली. देशात २८० मेट्रिक टन साखर उत्पादन झाले. तरीदेखील देशांतर्गत साखरेचे दर पाडण्यासाठी ५ लाख मेट्रिक टन कच्ची साखर आयात केली. सरकार शेतकरीविरोधी आहे. उद्योगपतींना फायदा करण्यासाठी हा प्रकार केला, असा आरोप अजित पवार यांनी केला.
सरकारला शेतकऱ्यांची आस्था नाही - अजित पवार
By admin | Published: April 12, 2017 1:23 AM