मुंबई : जे चांगलं आहे, त्याचा आम्ही नक्कीच स्वीकार करू. पण, शेतकऱ्यांच्या पायावर धोंडा पडणार असेल, तर मात्र आम्ही ते स्वीकारणार नाही. असे सांगत मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. तसेच, राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देत जी काही पिकं येतील ती येऊ द्या, निश्चिंत रहा, तुम्हाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी केंद्र सरकारने जे कृषी धोरण मंजूर केलेले आहे. त्याचे फायदे किंवा त्याचे फटके आपल्याला काय बसतील? त्याबद्दल देखील विचार सुरू आहे. आपल्या हिताचं काय? शेतकऱ्यांच्या हिताचं काय? हे पाहिलं जात आहे. माझं असंही म्हणणं नाही की सगळचं काही बरोबर किंवा चुकीचं आहे. जे बरोबर असेल त्याचा जरूर आम्ही स्वीकार करू. पण जर अयोग्य असेल व जर कुठं शेतकऱ्यांच्या पायावर धोंडा पडणार असेल, तर मात्र आम्ही ते स्वीकारणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
आपल्या राज्याचं धोरण आहे. आम्ही जे करू ते जनतेच्या हिताचं करू, शेतकऱ्यांच्या हिताचं करू. उगाचच काहीतरी कायदा आला आहे, म्हणून तो जसाच्या तसा नाही. चांगला असेल तर आनंदच आहे. पण जर का तसा नसेल तर मात्र या सर्व शेतकरी संघटनांशी आम्ही बोलतो आहोत. त्यांच्याकडून विविध सूचना येत आहेत. काही आक्षेप आहेत. काही गोष्टी समजून घेण्याची आवश्यकता आहे, यावर देखील विचार केला जात आहे. त्या सर्वांशी बोलून मग आपण या कृषी कायद्याबद्दल बोलूयात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
याचबरोबर, राज्यात निसर्ग च्रकीवादळ कोकणात येऊन गेली. पूर्व विदर्भात पूरपरिस्थिती गंभीर होती. या ठिकाणी आवश्यक ते सर्व काम आपण करत आहोत. पंचनामे जवळपास झाले आहेत. निसर्ग चक्रीवादाळाची मदत आपण बऱ्यापैकी दिली आहे. पूरपरिस्थितीबद्दलही सांगली, कोल्हापूर प्रमाणे आपण नुकसानभरपाई देत आहोत. तरी देखील त्याच्यानंतर सततच्या पावसामुळेही अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे. जी काही पिकं येतील ती येऊ द्या, शेतकऱ्यांनो निश्चित राहा, तुम्हाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. सर्व पिकांबाबत आपण खबरदारी घेत आहोत. सर्व ठिकाणी पंचनामे सुरू असून यथोयोग्य जी काही नुकसान भरपाई आहे. आपण ती देत जात आहोत. असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी सांगितले.
हमखास भाव मिळेल ते पिकवण्यासाठी आग्रह 'जे विकेल ते पिकेल' हे एक आपलं कृषीचं धोरण आहे. याबाबत आता आपण जनजागृती करत आहोत. ज्याला हमखास भाव मिळेल ते पिकवण्यासाठी सरकारचा आग्रह आहे. अनेक शेतकरी यामध्ये सहभागी होत आहेत. या सरकारची सुरुवातच आपण जवळपास साडेएकोणतीस लाख शेतकऱ्यांचं पीक कर्ज मुक्त करण्यापासून केली होती. मात्र तरी देखील हे चक्र सुरूच राहतं. यासाठी मग पीक आल्यानंतर ते साठवायचं कुठं? म्हणून आपण नाशिक परिसरात महाऑनिअन हा प्रकल्प सुरू केला. ही एक सुरूवात आहे. कांद्याप्रमाणेच सोयाबीन, कापूस यासाठी देखील आवश्यकतेनुसार साठवणुकीची व्यवस्था केली जाईल. ज्या ठिकाणी शीतगृहांची आवश्यकता आहे, तिथे ती व्यवस्था केली जाईल. साठवणुकीची आवश्यकता आहे तिथं गोदामं उपलब्ध केली जातील. यानंतर मग चागंली बाजारपेठ व शेतमाल यांची शेतकऱ्यांना सांगड घालून दिली जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.