तीन तासचा कमी वीज पुरवठाकमल शर्मा - नागपूरसध्या संपूर्ण राज्य वीज संकटाने घेरले आहे. विजेची मागणी १७ हजार ५०० मेगावॅटच्या उच्चांकावर पोहोचली आहे. ती मागणी पूर्ण करण्यासाठी जोड-तोड करून, केवळ १६ हजार मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे. असे असताना शहरात मात्र २४ तास प्रकाश आहे. निवडणूक काळात कुठेही विजेचा तुटवडा दिसून आला नाही. यामागील रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, शेतकऱ्यांच्या वाट्याची वीज शहरात वितरित करून महावितरण कंपनी स्वत:ची पाठ थोपटून घेत असल्याचे दिसून आले. दुसरीकडे विदर्भातील शेतकरी विजेसाठी त्रस्त झाले आहेत. त्यांच्या पिकांना पाणी मिळत नसल्याने, हाती आलेले उभे पीक मातीमोल होण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, महावितरण राज्यातील कृषीबहुल क्षेत्रातील फिडरवरून दिवसा आठ तास व रात्री दहा तास थ्री फेज विजेचा पुरवठा करते. याशिवाय इतर वेळी सिंगल फेज वीज दिल्या जाते.सिंगल फेजचा उपयोग काय ?ज्या फिडरवरून कृषी पंपासह गावातील कनेक्शन जुळले आहेत, अशाच ठिकाणी हा नियम लागू होतो. शिवाय ज्या फिडरवर केवळ कृषीपंपाचे कनेक्शन आहे, तेथे सिंगल फेज विजेचा पुरवठा होत नाही. कारण शेतकरी हा केवळ थ्री फेज विजेचाच उपयोग करू शकतो. राज्यातील विधानसभा निवडणुका पाहता महावितरणाची कुठेही लोडशेडिंग करण्याची इच्छा नव्हती. मात्र विजेच्या तुटवड्यामुळे त्यांना ते शक्य नव्हते. यात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गरीब शेतकऱ्यांना टार्गेट करून, गत दहा दिवसापासून शेतकऱ्यांना मिळणारा वीज पुरवठा अचानक कमी केला. त्यानुसार सध्या शेतकऱ्यांना दिवसा सात तास व रात्री आठ तास थ्री फेज वीज मिळत आहे. यावरून शेतकऱ्यांना रात्री दोन तास व दिवसा एक तास कमी वीज मिळत असल्याचे स्पष्ट होते. याचा सर्वाधिक फटका विदर्भातील धान उत्पादकांसह राज्यभरातील बागायतदार शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. शेतकरी महावितरणच्या कार्यालयात पायपीट करीत आहेत. महावितरणचे अधिकारी काहीच दिवसांची ही समस्या असल्याचे सांगून त्यांना परत पाठवित आहे. मात्र शेतकरी या समस्येने तेवढाच त्रस्त झाला आहे. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या विजेवर डल्ला
By admin | Published: October 17, 2014 1:06 AM