अमरावती - यवतमाळ जिल्ह्यातील झालेल्या अतिविषारी फवारणीच्या औषधांनी नाहक बळी गेलेल्या शेतकरी कुटुंबातील सदस्यांना भेटून सांत्वन करून याबाबत अधिक माहिती व मदत व्हावी या दृष्टीने आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह नेमलेल्या ५ विधानसभा सदस्यांच्या समितीने शनिवारी भेट दिली. मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची व रुग्णालयात दाखल असलेल्या शेतमजुरांची भेट घेतली.
शेतक-यांचा कर्दनकाळ ठरलेल्या या विषारी औषध बनविणाऱ्या कंपनीची कसून चौकशी करून यावर दोषी सर्व लोकांवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसह यास बळी पडलेल्या व जखमी शेतकरी कुटुंबांना सरकारने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी केली.
मृत मेटांगे व बंडू जनार्दन सोनूरले या शेतकरी कुटुंबाचे सांत्वन करून माणोली , टिटवी, वणी या गावातसुध्दा समितीने भेट दिली. सोबतच जिल्ह्याचे पालकमंत्री व महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनीही भेट घेऊन यावर बैठक पार पडली व त्यांना न्याय मिळावा याबाबत आमदार यशोमती ठाकूर व समितीने मागणी रेटून धरली। येत्या हिवाळी अधिवेशनात यावर प्रश्न उचलून सरकारला धारेवर धरुं, असे माजी मंत्री व आमदार विजय वडेट्टीवार, आमदार यशोमती ठाकूर, आमदार विरेंद्र जगताप यांनी सांगितले.