ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 07 - अकोला तालुक्यातील धामणा येथील शेतकरी गजानन संपत भांबेरे या शेतक-याने शुक्रवारी ७ जुलै रोजी शेतातच विष घेतल्याची घटना घडली. दरम्यान, शेतजमीन ताब्यात घेण्यासाठी शेगाव व नेर येथील खासगी सावकार धामणा येथे आले होते, त्यांनीच पोलिसांसमक्ष विष पाजले असल्याचा आरोप सदर शेतक-याचा मुलगा मंगेश भांबेरे याने पोलीस अधीक्षक कार्यालयात दिलेल्या निवेदनात केला आहे. याबाबत संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्याने केली आहे. दरम्यान, शेतकरी गजानन भांबेरे हे सर्वोपचार रुग्णालयात दाखल असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वृत्त आहे.
सदर घटनेबाबत मंगेश गजानन भांबेरे यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनानुसार गजानन भांबेरे यांची धामणा येथे गट नं. १०० ही शेतजमीन आहे. सदर शेतीवर त्यांनी शेगाव व नेर येथील दोन खासगी सावकारांकडून कर्ज घेतले होते. पण शेती भांबेरे यांच्या ताब्यात व वहितीत आहे. सदर शेतीबाबतचा अवैध सावकारीचा वाद दिवाणी न्यायालयात सुरू आहे. सदर जमिनीबाबत मनाईहुकूम देण्याबाबतचा सावकारांचा अर्ज दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावला असूनही ते पोलिसांच्या मदतीने शेतजमीन ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ही शेतजमीन ताब्यात घेण्यासाठी दोन्ही सावकार ७ जुलै रोजी दुपारी २ वाजता उरळ पोलीस स्टेशनच्या पोलिसांना घेऊन धामणा येथील भांबेरे यांच्या ताब्यातील शेतात आले होते. यावेळी दोन्ही सावकारांनी सदर पोलिसांसमक्ष शेतकरी गजानन भांबेरे यांना विष पाजले. यावेळी जवळच काम करीत असलेला त्यांचा मुलगा मंगेश आरडाओरड ऐकून धावत घटनास्थळी पोहोचला असता वडील खाली पडले होते. दोन्ही सावकार व त्यांच्या अन्य दोन कुटुंबीयांनी त्याच्या वडिलांना विष पाजले असल्याचे सांगितले. त्यामुळे मंगेशने वडील गजानन भांबेरे यांना तातडीने अकोल्यास हलवून सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, सदर घटनेबाबत तक्रार देण्यासाठी आपण उरळ पोलीस स्टेशनमध्ये गेलो असता तेथे त्याच्याकडून तक्रार घेण्यात आली नाही. त्यामुळे त्याने अकोल्यात येऊन पोलीस अधीक्षक कार्यालयात वरीलप्रमाणे तक्रार दाखल करून त्याच्या वडिलांचा जबाब लवकर घेण्यात येऊन सदर लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. शेतक-याचे मृत्युपूर्व बयाण अद्यापही घेण्यात आले नसल्याचे वृत्त आहे.