मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गात ज्यांच्या जमिनी जातील त्यांना लॅन्ड पुुलिंग किंवा जमिनीचा एक रकमी मोबदला असे दोन्ही पर्याय खुल असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिली. नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसोबतच तेथील बाधित शेतकऱ्यांची तातडीने बैठक घेण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.नागपूर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मागार्मुळे बाधित होणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या व अडचणी समजून घेण्याकरिता शिंदे यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, आमदार निर्मला गावित, राजाभाऊ वाझे, जि. प. सदस्य जनार्दन माळी, तालुका अध्यक्ष कचरू डुकरे, शेतकरी नेते पांडुरंग शिंदे, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष राधेश्याम मोपलावर, सहव्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर, उपसचिव किशोर माळी आदी उपस्थित होते. इगतपुरी तालुक्यात धरणग्रस्तांच्या जमिनींचा मोबदला अजून मिळाला नाही. तसेच, स्थलांतरीतांचे पुनर्वसन अजुन झाले नसल्याने या प्रकल्पाला देखील शेतकऱ्यांचा विरोध असल्याची बाब या बैठकीत लोकप्रतिनिधींनी मांडली. यावर प्रकल्पबाधितांना ले आउट प्लॉटचे प्रमाणपत्र दिल्याशिवाय कामच सुरु होणार नसल्याची माहिती मोपालवार यांनी दिली. या प्रक्रियेआधी सोशल इम्पॅक्ट असेसमेंट करण्यात येऊन प्रत्येक शेतकऱ्याची माहिती देखील संकलित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना एक रकमी मोबदल्याचा पर्याय उपलब्ध
By admin | Published: October 07, 2016 6:09 AM