अकोला : संरक्षित शेती करण्याकडे राज्यातील शेतकर्यांचा कल वाढला असून, पश्चिम विदर्भातील शेतकरी आता शेडनेट, पॉली हाउस शेती करीत आहेत. हरितगृह शेतीसाठी वर्हाडाला यावर्षी ४ कोटी ७५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. संरक्षित शेती संकल्पनेला विदर्भातील शेतकर्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, पॉलीहाउस-शेडनेट उभारणीकडे त्यांचा कल वाढला आहे. फळे, फुले, भाजीपाला पिकांसह या बीजोत्पादनाचा कार्यक्रम शेतकरी घेऊ लागले आहेत. वर्हाडाच्या विकासासाठी हे चांगले संकेत मानले जात आहेत. सतत बदलणार्या वातावरणाचा परिणाम पारंपरिक पिकावर होत आहे. या पारंपरिक पिकाच्या जोडीला नियंत्रित वातावरणातील पिकांचा आधार घेतल्यास शेतकर्यांच्या उत्पन्नात भर पडून प्रगती होईल. म्हणूनच पॉली हाउस शेतीमुळे शेतकर्यांना मोठा फायदा होत असून, संरक्षित शेतीला प्रोत्साहन व उत्पादनवाढीसाठी कृषी विभागातर्फे प्रयत्न केले जात आहेत. त्याकरिता एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत अभियानाच्या शेतकर्यांना अनुदान उपलब्ध केले जात आहे. यामध्ये मुख्यत्वे शेडनेट, प्लास्टिक मल्चिंग, हरितगृह, प्लास्टिक टनेल यासाठी अनुदान उपलब्ध आहे. यावर्षी पश्चिम विदर्भाला ४ कोटी ७५ लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहे. जिल्हानिहाय बुलडाणा जिल्हय़ाला १ कोटी रुपये मंजूर झाले असून, अकोला जिल्हा १ कोटी १५ लाख, वाशिम ३८ लाख, अमरावती जिल्हा १ कोटी ४४ लाख, तर यवतमाळ जिल्हय़ासाठी ७८ लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहे. या योजनेसाठी शेतकर्यांना ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत. ही प्रक्रिया सुरू झाली आहे. हरितगृह शेती करण्याकडे अलीकडे शेतकर्यांचा कल वाढला असून, कृषी विभागातर्फे शेतकर्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. कापूस, टरबूज अशा अनेक पिकांना शेतकरी प्लास्टिक मल्चिंग करू न चांगले उत्पादन घेत आहेत. यासाठी यावर्षी पावणेपाच कोटी अनुदान अमरावती विभागाला मिळाले असल्याचे विभागीय कृषी सहसंचालक शुद्धोदन सरदार यांनी सांगीतले.
राज्यात संरक्षित शेती करण्याकडे शेतक-यांचा कल!
By admin | Published: August 31, 2015 1:32 AM