शेतकरी, कष्टकरी, उद्योजक सहभागी! ‘भारत जोडो’त दुसऱ्या दिवशीही प्रचंड उत्साह; ‘तिरंगा’ ध्वज हाती घेऊन हजारो सामील
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 06:57 AM2022-11-09T06:57:08+5:302022-11-09T06:57:40+5:30
श्रीनिवास भोसले लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : ‘भारत जोडो’ पदयात्रेच्या महाराष्ट्रात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारी राज्यातील ग्रामीण भागातून दाखल ...
श्रीनिवास भोसले
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : ‘भारत जोडो’ पदयात्रेच्या महाराष्ट्रात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारी राज्यातील ग्रामीण भागातून दाखल झालेेले कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, उद्योजक, युवक अशा सर्व घटकांतील नागरिक ‘तिरंगा’ ध्वज घेऊन सहभागी झाले होते. हजारो नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग राहुल गांधींसह यात्रेकरूंचा उत्साह वाढविणारा ठरला.
सोमवारी रात्री उशिरा खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा तेलंगणातून देगलूर शहरात दाखल झाली. यात्रेच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांशी संवाद साधल्यानंतर पदयात्रा पुढच्या दिशेने निघाली. गुरुनानक यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला वेन्नाळी येथे गुरुद्वारा येथे राहुल यांनी दर्शन घेतले. मंगळवारी सकाळी ७.३०च्या सुमारास वेन्नाळी येथून पदयात्रेला प्रारंभ झाला. दुसऱ्या दिवशी यात्रेत नागरिकांची संख्या दुपटीने वाढली. वेन्नाळी येथून आटकळीमार्गे बिलोली तालुक्यातील खतगाव फाटाकडे यात्रा मार्गस्थ झाली. वाटेत आटकळी येथे शेकडो ग्रामस्थ, शेतमजूर कामे आटोपून यात्रेत दाखल झाले. विद्यार्थी, युवकांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा सादर केल्या.
द्वेषाचे राजकारण; भावाभावात भांडणं
भोपाळा येथे सायंकाळी राहुल यांनी कॉर्नर सभेत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने द्वेषाचे राजकारण सुरू केले आहे. भावाभावांत भांडणे लावली जात आहेत. देशातील काही लोकांचे धन दुप्पट होते, मग आमचं का नाही? काही वर्षांपूर्वी याच दिवशी नोटबंदी आणली होती. नोटबंदीने छोटे व्यापारी, शेतकऱ्यांवर आफत आणली.