बुलडाणा : सावकाराने हडप केलेल्या जमिनी महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ च्या कायद्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी चौकशी करून शेतकऱ्यांना परत मिळवून दिल्या.मोताळा तालुक्यातील सुपडाबाई उर्फ कुमुद मांगो बावस्कर (रा. खांडवा) या महिलेने ६ फेब्रुवारी २०१५ रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली होती. खांडवा शिवारातील त्यांचे ०.८ आर शेत जामनेर पुंडलिक बाबूराव पाटील या सावकाराने खरेदी केले होते. चौकशीनंतर खरेदी अवैध सावकारी व्यवहारातून झाल्याचे सिद्ध झाले. दुसऱ्या प्रकरणात शेगाव तालुक्यातील गौलखेड येथील कर्जदार भानुदास रामकृष्ण शेजोळे यांच्या मालकीचे एकूण २ हेक्टर ५६ आर. शेत नाममात्र खरेदी खत करून शिवकुमार श्रीराम अग्रवाल अकोला यांनी हडप केले होते. भानुदास शेजोळे यांनी १७ डिसेंबर २०१४ रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली होती. महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम १८ (२) आणि महाराष्ट्र सावकारी नियम १७ नुसार प्राप्त अधिकारान्वये ही कारवाई जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी केली. (प्रतिनिधी)
सावकाराच्या जोखडातून शेतकऱ्यांच्या जमिनी मुक्त
By admin | Published: May 16, 2016 2:28 AM