औरंगाबाद : विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाला मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पहिल्या दिवशी प्रतिसाद दिला. शहराकडे जाणारा दूध-भाजीपाला रोखण्यात आला. औरंगाबादेत व्यापाऱ्यांनी शेतकरी नेत्याला मारहाण केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. औरंगाबादेतील फळ-पालेभाज्या, धान्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या जाधववाडीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे पहाटेच भाजीपाला विक्रीसाठी आणला होता. किसान क्रांतीचे समन्वयक जयाजी सूर्यवंशी यांच्यासह ५० ते ६० कार्यकर्त्यांनी टरबूज फेकून देण्यास सुरुवात केली. काहींनी आंबे, टोमॅटोही फेकून दिले. मात्र, किरकोळ व्यापाऱ्यांनी हा माल शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला होता. या प्रकाराने संतापलेल्या व्यापाऱ्यांनी जयाजी सूर्यवंशी यांना ओट्यावरून खाली ढकलून दिले व मारहाण करण्यास सुरुवात केली. यात गजानन देशमुख या शेतकऱ्यास जास्त मार लागला. सिडकोतील पोलीस निरीक्षक के. एम. प्रजापती, पोलीस फौजफाट्यासह तेथे आले व त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आली. बीड जिल्ह्यात परिणामशेतकऱ्यांनी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या शेतकरी संपाचा बीड जिल्ह्यात परिणाम जाणवला. शेतकरी क्रांती मोर्चासह विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन विविध ठिकाणी करण्यात आले. संपाला पाठिंबा म्हणून बीड येथे जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. पाचेगाव येथे आठवडी बाजार भरला नाही. मादळमोही येथे भाजीपाला तर आष्टी येथे दूध रस्त्यावर सांडून शासनाचा निषेध नोंदविला. नांदेड जिल्हा कचेरीसमोर दुग्धाभिषेकनांदेडात दाखल होणारा भाजीपाला, दूध आदी शेतीउत्पादने रोखण्याचा प्रयत्न किसानपुत्रांनी केला़ शहरानजीकच्या खडकुत, पिंपळगाव पाटीजवळ शेतकऱ्यांनी एकत्रित येत शहरात दाखल होणाऱ्या वाहनांची पहाटे ४ वाजेपासूनच तपासणी केली़ अरेरावी सुरू केली अथवा शहरात जाण्यासाठी आग्रह धरला, अशा वाहनातील भाजीपाला, दूध आंदोलकांनी रस्त्यावर टाकला़ मिरची, पालेभाज्या आणि दूध पडलेल्या रस्त्याला पांढरा आणि हिरवा रंग आला होता़ स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, शेतकरी संघटना व किसान मोर्चाच्या वतीने जिल्हा कचेरीसमोर मुख्यमंत्र्याचा म्हणून प्रतीकात्मकरीत्या टरबुजाचा दुग्धाभिषेक करीत सरकारविरोधात घोषणाबाजी केली़ दूध, भाजीपाला विक्री जालन्यात थांबविलीभाजीपाला, दूध विक्री थांबवून जालना जिल्ह्यातील शेतकरी संपात सहभागी झाले. तालुक्यातील रोहनवाडी, रेवगाव, कुंबेफळ, इंदेवाडी, बाजीउम्रद, काजळा आदी गावच्या शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्री न करण्याचा निर्णय घेतला. जालना शहर परिसरातील रोहनवाडी, इंदेवाडी, बेथलम, रेवगाव, कुंबेफळ, राममूर्ती, देवमूर्ती आदी गावांतून जालना मोंढ्यात आलेला भाजीपाला शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरला. त्यामुळे काही काळ येथे तणाव निर्माण झाला. परभणीत भाजीपाला घातला जनावरांनापरभणी जिल्ह्यामध्ये या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला़ गंगाखेड येथे काही शेतकऱ्यांनी दूध विक्री केली नाही तर काहींनी विक्रीसाठी आणलेला भाजीपाला जनावरांना देऊन आपला रोष व्यक्त केला़ मानवत तालुक्यात आठवडी बाजारात विक्रीसाठी आणलेली भाजी अक्षरश: रस्त्यावर फेकून देण्यात आली़ पुर्णेमध्ये शेतकऱ्यांच्या संपाला आडत व बियाणे विक्रेत्यांनी पाठिंबा देऊन दिवसभर बंद पाळला़ पश्चिम महाराष्ट्रातून परभणी जिल्ह्यामध्ये गुरुवारी एकही दुधाची गाडी दाखल झाली नाही़ पुणे जिल्ह्यात भाजीपाला, दूध रस्त्यावरजिल्ह्यातील तेरा तालुक्यांत गुरुवारी शेतकरी संपात मोठ्या प्रमाणात शेतकरी रस्त्यावर उतरले. शेतमाल घेऊन जाणाऱ्या गाड्या रोखल्या, तसेच दूध रस्त्यावर ओतण्याचे प्रकार घडले. आठवडे बाजार बंद पाडले. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. बारामतीत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या गाड्या टोलनाक्यांवरच रोखण्यात आल्या. जळोची येथील उपबाजारातील लिलाव बंद पाडले, तर बाजार समितीच्या आवाराला कुलूप ठोकले. इंदापूरलाही ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर आले. वालचंदनगरचा आठवडे बाजार बंद पाडला. वडापुरीला बाजार भरलाच नाही. बावडा येथील आठवडे बाजारही बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. हिंगोलीत प्रतिसादहिंगोली जिल्ह्यातील बासंबा येथील शेतकऱ्यांनी गुरुवारी बाजारपेठेत माल विक्रीस नेण्याचे थांबविले. या शेतकऱ्यांनी परिसरातून माल विक्रीस घेऊन जाणारी वाहनेही थांबविली. पेडगाव येथील शेतकऱ्यांनी गहू व दूध रस्त्यावर ओतून संपात सहभाग नोंदविला. दौंड तालुक्यात पुणे-सोलापूर महामार्गावर कासुर्डी (ता. दौंड) येथे शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन करीत शेतीमाल घेऊन जाणाऱ्या गाड्या अडवून शेतीमाल महामार्गावर फेकून दिला. या वेळी महामार्गावर शेतीमालाचा खच पडून वाहतूक विस्कळीत झाली होती. तर कांदा, बटाटा, कलिंगड, अंडी, कैरी आदी महामार्गावर टाकण्यात आले होते. भोर तालुक्यातील शेतकरी सहकारी दूध उत्पादक संस्थांनी दूध संकलन न करता, दूध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध नोंदवला.
मराठवाड्यातील शेतकरी रस्त्यावर
By admin | Published: June 02, 2017 1:16 AM