पवनार (वर्धा) : देशातील ६० टक्के जनता आजही शेतीशी निगडीत आहे. गोवंश हत्याबंदीची चळवळ केवळ दिल्ली-मुंबईशी निगडीत नसून ती गावा-गावाशी, शेतीशी निगडीत आहे. त्यामुळे गोहत्या बंदीसाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांचे स्वावलंबन गरजेचे आहे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणार नाही, तोपर्यंत गोहत्या बंदीला संपूर्ण यश मिळणार नाही, असे मत डॉ. अशोक बंग यांनी व्यक्त केले. गोवंश हत्याबंदी व्हावी, यासाठी दिल्लीत सत्याग्रह सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर पवनार येथील ब्रह्मविद्या मंदिरात विचारमंथन कार्यक्रमात डॉ. बंग बोलत होते. एका बैलजोडीने ४-५ वर्षे काम केल्यानंतर पुढील ३-४ वर्षे तिचे निव्वळ पालनपोषण करावे लागते. यासाठी येणारा खर्च झेपणारा नसतो. म्हणून त्या जनावरांची रवानगी कत्तलखान्याकडे होते. अशा जनावरांसाठी गोशाळा निर्माण झाल्या तरी त्या पुरेशा नाहीत. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी डबघाईस आला आहे. कामायोग्य नसलेल्या जनावरांचे पालनपोषण तो करू शकत नाही, असेही ते म्हणाले. मंगळवारच्या चर्चासत्राचे अध्यक्ष खुदाई खिदमद्गारचे फैसलभाई यांनी सर्वोदय वाचविण्यासाठी गोवंश वाचविणे गरजेचे आहे परखड मत व्यक्त केले. गोहत्या कुण्या जाती-धर्माशी निगडीत नसून ती विचारांशी निगडीत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी कुराणातले अनेक दाखलेही दिले.
गोहत्या बंदीसाठी शेतकरी स्वावलंबन गरजेचे -अभय बंग
By admin | Published: August 19, 2015 12:46 AM